‘अहो दादा, असं मोघलांसारखं काय बोलता’, मिटकरींचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात
औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नामांतरावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
मुंबई : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नामांतरावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोघांकडूनही एकमेकांवर चांगल्याच शाब्दिक तोफा डागल्या जात आहेत. आता अमोल मिटकरी यांनी थेट बिहारचा संदर्भ देत भाजपची कोंडी केली आहे. भाजपची सत्ता असलेल्या बिहारमध्ये देखील औरंगाबाद नावाचं शहर आहे. त्यावर भाजप काही बोलणार का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी केलाय. तसेच अहो दादा, असं मोघलांसारखं का बोलता, असं म्हणत चंद्रकांत पाटलांवर जहरी टीका केली (Political fight between Amol Mitkari and Chandrakant Patil over rename of Aurangabad as Sambhajinagar).
अमोल मिटकरी म्हणाले, “अहो दादा बिहारमध्ये पण औरंगाबाद नावाचं शहर आहे असं म्हणतात. त्याबद्दल भाजप सरकार काही बोलणार आहे की नाही? असं मोघलांसारखं काय बोलता. आम्ही “छत्रपती संभाजी महाराजांचं” नाव विमानतळाला देणाऱ्या प्रस्तावास केंद्र सरकारने अजून मंजुरी का दिली नाही?”
चंद्रकांत पाटील यांनी याआधी औरंगाबाद महानगरपालिका हातात द्या, दुसऱ्याच दिवशी शहराचं नाव संभाजीनगर करतो असा दावा केला होता. यानंतर अमोल मिटकरी यांनी पाटलांना अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता असलेल्या गुजरातमधील अहमदाबादचं नामकरण कर्णावती करुन दाखवा, असं आव्हान केलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी अहमदाबादचं नाव बदला, उस्मानाबाद पण बदला, माझी काहीच हरकत नाही पण औरंगाबादचं नाव बदलायचं नाही म्हणजे तुमचं औरंगजेबावर प्रेम आहे का? असा जळजळीत सवाल मिटकरींना केला होता.
“अहमदाबादचं कर्णावती करायला माझी काहीच हरकत नाहीय. परंतु जिथे तुमची सत्ता आहे तिथली नाव आधी बदला ना…” असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी मिटकरी यांना दिला आहे. “त्यांच्याकडे औरंगाबादचं संभाजीनगर करायची इच्छाशक्ती नाही. महाविकास आघाडीला केवळ महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करायचं आहे”, अशी टीका पाटील यांनी केली.
औरंगाबादच्या नामांतरावरुन चंद्रकांत पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते असा सामना रंगला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत औरंगाबाद महापालिकेत सत्ता आल्यास पहिल्या दिवशी संभाजीनगर करु, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटलांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीचे नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. यामध्ये अमोल मिटकरी यांनी पाटलांचा खरपूस समाचार घेतला.
अहमदाबादचं नाव कर्णावती करा- मिटकरी
गुजरातची सत्ता किती काळ भाजपजवळ आहे?, एवढ्या दिवसात अहमदाबादच नाव का बदललं नाही?, असा सवाल करत भाजपात खरी ताकद असेल तर दिलेला शब्द पाळा आणि अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करुन दाखवा, असं मिटकरी म्हणाले.
औरंगाबादची सत्ता द्या, दुसऱ्या दिवशी संभाजीनगर करतो- चंद्रकांत पाटील
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना औरंगाबाद नामांतराचा प्रस्ताव मागे का घेण्यात आला? , असा सवाल करत महापालिका आमच्या हातात द्या पहिल्याच दिवशी नामांतर करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. औरगांबादच्या नामकरणाचा विषय राजकारणाचा नाही. नामकरणाची कायदेशीर प्रक्रिया नव्यानं करावी लागणार आहे, असं ते म्हणाले.
सरकार चालविण्यासाठी शिवसेनेला जशी काँग्रेसची गरज आहे. तशी कॉग्रेसलाही शिवसेनेची गरज आहे. त्यामुळे सामंजस्याने तोडगा काढावा, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला. पुण्याचं नाव बदलण्याबद्दल पत्रकांरांनी विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी याबाबत निर्णय घ्यायचा असतो, अशी प्रतिक्रिया दिली.
संबंधित बातम्या
औरंगाबादकरांनो, महापालिका हातात द्या, पहिल्याच दिवशी संभाजीनगर करुन दाखवतो : चंद्रकांत पाटील
शहरांची नाव बदलण्यापेक्षा तुमची प्रवृत्ती बदला, मिटकरींचा भाजपवर घणाघात
Political fight between Amol Mitkari and Chandrakant Patil over rename of Aurangabad as Sambhajinagar