Bharat Bhalke | हॅटट्रिक आमदार ते जनसामान्यांचा नेता, भारत भालके यांची कारकीर्द
पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी (27 नोव्हेंबर) मध्यरात्री निधन झालं. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी चर्चा सुरु झाली आहे.
सोलापूर : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी (27 नोव्हेंबर) मध्यरात्री निधन झालं. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी चर्चा सुरु झाली आहे. भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. त्यांनी आपल्या जनसंपर्काच्या बळावरच विधीमंडळाच्या सदस्यत्वाची म्हणजेच आमदारकीची हॅटट्रिक मारली. त्यांची ओळख जनसामान्यांचा नेता अशीच राहिली. त्यांनी तालुक्याच्या राजकारणात 1992 मध्ये सक्रिय सहभाग घेतला. ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही निवडून आले. तेथून सुरु झालेल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पुढे ते 2002 मध्ये याच कारखान्याचे अध्यक्षही झाले. तेव्हापासून आजपर्यंत अध्यक्षपद राखत त्यांचंच या कारखान्यावर वर्चस्व राहिलं (Political Journey of NCP MLA Bharat Bhalke).
भारत भालके सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले. मात्र या तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2009 मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि ते राजकारणातील जायंट किलर ठरले. 2019 मध्ये त्यांनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला. विशेष म्हणजे 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खरंतर त्यावेळी ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ऐनवेळी भारत भालकेंनी ‘डब्ल्यू’ टर्न घेत कमळ हाती घेता-घेता अचानक राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ हाती बांधलं होतं.
भाजपऐवजी राष्ट्रवादीमध्ये प्रवेशामागील घटनाक्रम काय?
2019 मध्ये भारत भालके यांनी काँग्रेसला अनौपचारिक रामराम ठोकल्यावरही भाजपकडून त्यांना होल्डवर ठेवण्यात आलं होतं. मात्र विधानसभेच्या तोंडावर सावध निर्णय घेत भालके यांनी भाजपऐवजी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेण्याचं ठरवलं. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत निवडणुकांना सामोरं जाणार असल्याने पंढरपूरच्या जागेवरुन तणातणी होण्याची शक्यता कमीच होती.
दुसरीकडे भाजप-शिवसेनेचा तोपर्यंत युतीचा निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे युती झाल्यास शिवसेनेकडून माढा ऐवजी पंढरपूरची जागा भाजपला सुटणार का, या द्विधा मनस्थितीत आमदार भारत भालके होते. युतीची घोषणा तोपर्यंत झाली नसल्याने भाजपच्या पक्षनेतृत्वाने भालकेंना होल्डवर ठेवलं होतं, त्यामुळे भालकेंची धाकधूक वाढली होती.
आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत भालके यांच्या घरी फराळाचा आस्वाद घेतल्यानंतर भालके यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. मात्र त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर करुन या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
कोण आहेत भारत भालके?
- पंढरपूर- मंगळवेढ्यातून काँग्रेस आमदार भारत भालके
- भारत भालके यांनी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीला दांडी मारली होती.
- काँग्रेसच्या अनेक बैठकांना पाठ फिरवली
- भारत भालकेसुद्धा भाजप प्रवेशासाठी मुंबईत तळ ठोकून होते
- भारत भालकेंच्या प्रवेशाला भाजपमधील परिचारक गटाने मोठा विरोध केला
भारत भालके यांच्या निवडणुकांचा इतिहास
- 2004 : शिवसेना – पराभूत
- 2009 : रिडालोस – विजयी
- 2014 : काँग्रेस- विजयी
- 2019 : राष्ट्रवादी – विजयी
- हॅटट्रिक आमदार म्हणून आमदार भारत भालके यांची ओळख
- 2009 मध्ये पंढरपूर विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करुन जायंट किलर ठरले
- 2019 मध्ये माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला
- 2002 पासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून आजतागायत काम पाहत होते
- 1992 मध्ये ते तालुक्याच्या राजकारणात सक्रीय झाले. विठ्ठल कारखान्याचे संचालक म्हणून सुरुवात केली
भारत भालके यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी, तीन विवाहित मुली आणि एक मुलगा आहे.
संबंधित बातम्या :
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन
‘भालके नेहमी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी धडपड करायचे; महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला’
Photos : जनसामान्यांचा लोकप्रिय नेता भारत भालके!
Political Journey of NCP MLA Bharat Bhalke