पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोग गंभीर, पुणे पोलिसांकडून अहवाल मागवला
पूजा चव्हाण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पाठवण्याचे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांना दिला आहे.
पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राज्यात जोरदार राजकारण रंगलं आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात समोर आल्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. अशावेळी पूजा चव्हाण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पाठवण्याचे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांना दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणात आता लक्ष घातल्याचं दिसून येत आहे.(National Women’s Commission serious in Pooja Chavan suicide case)
दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या आदेशानुसार पुणे पोलीस पूजा चव्हाण प्रकरणाचा अहवाल लवकरच सोपवण्याची शक्यता आहे. सध्या या अहवालावर पुणे पोलिसांचं काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरु केला आहे. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे हे स्वत: या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत.
पुणे पोलिसांकडून पोलिस महासंचालकांना प्राथमिक रिपोर्ट सादर
पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा प्राथमिक रिपोर्ट राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना सादर केला होता. त्यानंतर ते आता पुण्यात आल्याने त्यांचा हा पुणे दौरा विशेष महत्त्वाचा मानला जातोय.
पुणे पोलिसांचं पथक यवतमाळला
पुणे पोलिसांचं पथक देखील यवतमाळला गेलं आहे. तिथे जाऊन ते या घटनेचे आणखी काही धागेदोरे मिळतायेत का? याची झाडाझडती घेत आहे. शासकिय पातळीवरुन देखील या प्रकरणाच्या चौकशीसाठी वारंवार विचारणा होत असल्याने पुणे पोलिस वेगाने सूत्रं फिरवत आहेत.
संजय राठोड यांच्या राजीनाम्याचं वृत्त चुकीचं
पूजा चव्हाण प्रकरणात नाव आलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त होतं. पण राठोडांनी राजीनामा दिल्याची माहिती माझ्याकडे नाही. त्याबाबत मुख्यमंत्री माहिती देतील. मी भाष्य करणं योग्य नाही. ती माहिती चुकीची आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राठोड यांनी स्पष्ट केलं आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. येथे कायद्याचे राज्य आहे. प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चौकटीत होतील. या प्रकरणात उच्च स्तरीय चौकशी सुरु आहे तपास हा एकाच चौकटीत फिरत नसतो. वेगवेगळ्या दिशेने तपास केला जातो. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचेसुद्धा लक्ष आहे. राठोड यांच्या राजीनाम्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. मुख्यंमंत्र्यांकडे राजीनामा दिला असेल, तर याविषयी ते जाहीर करतील. मी त्याविषयी बोलणे बरोबर नाही. राजीनाम्याची माहिती चुकीची आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या :
पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री संवेदनशील; केवळ आरोपावरून कारवाई करणं चुकीचं: दीपक केसरकर
Pooja Chavhan case : पुणे पोलिसांचे पथक यवतमाळमध्ये दाखल, रुग्णालयातील उपचाराबाबत तपास होणार
National Women’s Commission serious in Pooja Chavan suicide case