प्रकाश आंबेडकर हुशार नेते; तर… आम्ही त्यांचे बारा वाजवू, रामदास आठवले संतापले, राहुल गांधी यांना दिला इशारा
2012 मध्ये मुंबई महापालिकावेळी आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शिव शक्ती आणि भीम शक्तीचा नारा दिला. मुंबई शहरात माझ्या पक्षाची ताकद मजबूत आहे.
मुंबई | 14 जानेवारी 2024 : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केलीय. माजी खासदार मिलिंद देवरा हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येणे शक्य नाही. त्यामुळे ते शिंदे गटात गेले असावेत. उध्दव ठाकरे हे संपणारे पक्ष संपवतात. माझ्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न झाला नाही. झाला तरीही आम्ही सक्षम आहोत. 2012 मध्ये मुंबई महापालिकावेळी आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शिव शक्ती आणि भीम शक्तीचा नारा दिला. मुंबई शहरात माझ्या पक्षाची ताकद मजबूत आहे असे रामदास आठवले म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनातली खदखद आता अडीच वर्षानंतर बाहेर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेला निर्णय हा मेजॉरीटीवर आधारित आहे. त्यामुळे आमचे सरकार स्थिर आहे. शिंदे जाणार अशी अफवा कुणीही पसरवू नये असेही ते म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळात आमचा मंत्री नाही. रिपाईमध्ये गट असेल पण आमचा तळागाळातील गट आहे. आम्हाला पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिपद मिळालं पाहिजे होते. परंतु, आम्हाला का डावललं जात आहे हे कळत नाही. अजित पवारांचा विस्तार झाला. मात्र, आमचा कधी होतो ते बघावं लागेल. यासंदर्भात केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नद्द्दा यांना भेटणार आहे असे आठवले यांनी सांगितले. राज्यसभेची नुदत 2026 पर्यंत आहे. मात्र, मला संधी मिळाली पाहिजे. आरपीआयला लोकसभेच्या दोन जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली.
राम मंदिर हा कार्यक्रम कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाही. जिथे मशीद होणार आहे त्याच परिसरामध्ये विहार बांधावा अशी आमची मागणी आहे. राम मंदिर कार्यक्रमाचे निमंत्रण अजून आलेले नाही. मात्र, निमंत्रण दिले तर आम्ही जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांच्यावर टीका
कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे आता भारत जोडो यात्रा काढत आहेत. त्याचा पक्ष सत्तेत होता त्यावेळी त्यांनी देश जोडला नाही. तर देश तोडला. त्यामुळे त्यांची ही यात्रा भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा आहे. आता पक्ष सत्तेत नाही तेव्हा त्यांना भारत जोडो यात्रेची आठवण होत आहे अशी टीका आठवले यांनी केली. राहुल गांधी यांनी एखाद्या दलित मुलीशी लग्न करावे. त्यांनी सांगितलं तर लग्नासाठी मुलगी शोधतो असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आदर्श पण…
प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मला आदर्श आहे. ते आंबेडकरांचे वंशज आहेत. आमच्या समाजातील अत्यंत हुशार नेते आहे. मात्र, त्यांना जो निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय त्यांनी लवकर घेतला पाहिजे. आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये 12, 12 जागा वाटून घेतल्या तर आम्हाला त्यांचे बारा वाजवायला वेळ लागणार नाह अशी टीकाही आठवले यांनी आंबेडकर यांच्यावर केली.