भाजपाला उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणेच एकनाथ शिंदेही…, प्रकाश आंबेडकर यांचं युतीबाबत मोठं वक्तव्य
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना (Shiv sena) यांच्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपाला जसे उद्धव ठाकरे नको होते तसेच त्यांना एकनाथ शिंदे हे देखील नको आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की येत्या काही दिवसांत महापालिका, नागरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटासोबत युती करते की नाही ते पहावे लागेल. जर परिस्थिती अनुकूल दिसली तरच भाजप शिंदे गटासोबत युती करेल.
‘लोकशाहीत मतदार राजा’
दरम्यान राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावर दोखील त्यांनी जोरदार टीका केली आहे. वैयक्तिक स्तरावर सुरू असलेलं राजकारण काही योग्य नाही. ही गादीची लढाई नाही, हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवावं. देशात लोकशाही आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो. तोच ठरवेल सत्ता कोणाच्या हातात द्यायची, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
पोटनिवडणुकीवरून आरोप – प्रत्यारोप
सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या निवडणुकीवरून सध्या दोन्ही पक्षाकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली आहे. ही गादीची लढाई नाही हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवावं. देशात लोकशाही आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.