मोदींची पुढची रणनीती काय?, अखिलेश यादवांनाही कानपिचक्या; वाचा Prashant Kishor यांचं अचूक विश्लेषण
पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पाचपैकी चार राज्यात सत्ता आल्याने भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. या पाचही राज्यातील निवडणुकीच्या निकालांवर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठं भाष्य केलं आहे.
नवी दिल्ली: पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पाचपैकी चार राज्यात सत्ता आल्याने भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. या पाचही राज्यातील निवडणुकीच्या निकालांवर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी मोठं भाष्य केलं आहे. भारताची लढाई ही 2024मध्ये होईल. तेव्हाच खरा निर्णय होईल. ती एखाद्या राज्यात लढली जाणार नाही हे साहेबांना चांगलं माहीत आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुकांवरून ते वातावरण निर्मिती करण्याच्या कामाला लागले आहेत. विरोधकांवर मानसिक दबाव वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या चुकीच्या नरेटिव्हला फसू नका, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. तसेच तुम्ही कितीही डायनॅमिक नेते असाल पण फक्त निवडणुकीच्या दोन ते तीन महिने आधी तुम्हाला जाग येत असेल तर तुम्ही भाजपला(bjp) हरवूच शकत नाही, असा टोला प्रशांत किशोर यांनी सपा नेते अखिलेश यादव (akhilesh yadav) यांना लगावला आहे.
प्रशांत किशोर यांनी ट्विट करून पाच राज्यातील निवडणूक आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रणनीती काय असू शकते हेही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकाला नंतर 2024साठी भाजप राज्यांमध्ये वातावरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ते यशस्वी ठरतीलच असं नाही, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी भाषण केलं होतं. आम्ही 2019ची निवडणूक जिंकलो. 2017मध्येच 2019चा आमचा विजय पक्का झाल्याचं लोक सांगत होते. त्यामुळे आता 2022मध्ये यूपीत भाजपचा विजय झाला आहे. हे 2024साठीचे हे संकेत आहेत असं ज्ञानी लोक सांगत आहेत, असं मोदी म्हणाले होते. त्याचवेळी त्यांनी राजकीय विश्लेषकांवर टीक करताना आता त्यांनी आपलं बेसिक व्यवस्थित करावं, असा खोचक सल्लाही दिला होता.
सपाची निवडणूक प्रचार मोहीम भरकटलेली
प्रशांत किशोर यांनी ‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना अखिलेश यादव यांना कानपिचक्या दिल्या आहेत. उत्तर प्रदेशात कोणताच नॅरेटीव्ह नव्हता, असं त्यांनी सांगितलं. पाच राज्यातील निवडणूक निकालाबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर, राज्यांमध्ये काय झालं? मजबूत, विश्वासू नेता आणि आव्हान देणारा नेता देण्यास विरोधी पक्ष अपयशी ठरले, असं त्यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीची निवडणूक मोहीम पूर्णपणे भरकटलेली होती. पश्चिम बंगालचं उदाहरण घ्या. ममता बॅनर्जी या रात्र न् दिवस मेहनत घेत होत्या. बरं त्या एक दोन महिन्या आधीच राबत नव्हत्या. दोन ते तीन वर्ष त्या मेहनत घेत होत्या. मजबूत निवडणूक कॅम्पेन केलं. त्यानंतर त्या भाजपला हरवण्यात यशस्वी ठरल्या, असंही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात सपाकडे चेहरा होता, पण
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी हा मजबूत पक्ष होता. अखिलेश यादव यांच्या रुपाने त्यांच्याकडे चेहरा होता. मात्र काऊंटर नॅरेटिव्ह नव्हता. निवडणुकीच्या दोन तीन महिने आधी जागून निवडणुका लढण्याचा पारंपारिक फंडा उपयोगी पडणार नाही. तुम्ही कितीही डायनामिक नेते असले तरी, तुमचा पक्ष कितीही मजबूत असला तरी केवळ दोन तीन महिने आधी जागून फरक पडणार नाही. 200 सभा घेतल्या, भाजपवर टीका केली तर काम होणार नाही हे स्पष्ट झालं आहे, असंही ते म्हणाले.
प्रशांत किशोर सध्या काय करतात?
प्रशांत किशोर सध्या टीएमसीसाठी निवडणूक रणनीती तयार करत आहेत. प्रशांत किशोर यांचा टीएमसीसोबत 2024पर्यंत करार झाला आहे. 2024पर्यंत राष्ट्रीय पक्ष म्हणून इमेज तयार करण्याचा टीएमसीचा प्लान आहे. त्याच रणनीतीचा भाग म्हणून टीएमसीने गोवा, यूपीसहीत अनेक राज्यांमध्ये निवडणुका लढवण्यास सुरुवात केली आहे. 2019च्या निवडणुकीत भाजपला पश्चिम बंगालमध्ये 18 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर टीएमसीने प्रशांत किशोर यांना आपल्यासोबत घेतलं. तेव्हापासून ते ममता बॅनर्जी यांच्यासाठी राजकीय रणनीती तयार करत आहेत.
Battle for India will be fought and decided in 2024 & not in any state #elections
Saheb knows this! Hence this clever attempt to create frenzy around state results to establish a decisive psychological advantage over opposition.
Don’t fall or be part of this false narrative.
— Prashant Kishor (@PrashantKishor) March 11, 2022
संबंधित बातम्या:
फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडियाच्या दुरुपयोगामुळे लोकशाहीला धोका, सोनिया गांधींचा संसदेत हल्लाबोल
Maharashtra News Live Update : रश्मी शुक्लांविरोधात 500 कोटींचा दावा दाखल करणार : नाना पटोले