रश्मी ठाकरे यांच्याकडून टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन; प्रताप सरनाईक म्हणतात, अशा प्रकारे…
तेव्हापासून मला आनंद दिघे यांचा सहवास लाभला. दिघे साहेबांचा शिष्य म्हणून या देवीच्या स्थापनेत आमचं देखील योगदान आहे, याचा आनंद होत आहे, असंही ते म्हणाले.
गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (rashmi thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बालेकिल्ल्यात येऊन टेंभी नाक्यावरील देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. या शक्तीप्रदर्शनावर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी जोरदार टीका केली आहे. देवीच्या मंदिरात अशाप्रकारे शक्तीप्रदर्शन करणे हे चुकीचं आहे. मी देखील इथे आलो आहे. परंतु मी माझे कार्यकर्ते आणले नाहीत. ते योग्य देखील वाटला नसतं. देवीच्या दर्शनाला येत आहात की राजकारणाला येत आहात? या ठिकाणी शक्तिप्रदर्शन करणं हे अयोग्य आहे, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
आमदार प्रताप सरनाईक मीडियाशी संवाद साधत होते. आनंद दिघे यांनी या उत्सवाला सुरुवात केली. तेव्हा देखील आनंद दिघे यांनी व्यापाऱ्यांना प्राधान्य दिलं. त्यांचा सहभाग करून घेतला. आनंद दिघे यांच्या मृत्यू नंतर एकनाथ शिंदे यांना मंडळाचे अध्यक्ष होण्याचा आग्रह झाला. परंतु,शिंदे यांनी कधीच राजकारण करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी या मंडळाला सर्वतोपरी मदत केली. त्यांच्याच समन्वयाने हे मंडळ वाटचाल करत आहेत. या ठिकाणी कोणीही राजकारण करू नये अशी विनंती आहे, असं आवाहन त्यांनी केलं.
राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. त्यामुळे या राज्यात सुख, समृद्धी आणि शांतता लाभू दे, असं गाऱ्हाणं देवीला घातलं आहे. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी तुला देखील केली आहे. राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी निर्णय घ्यावेत अशी देवीकडे प्रार्थना केली आहे. दुर्गेश्वरी देवीला मी लहानपणापासून येत आहे. तेव्हापासून मला आनंद दिघे यांचा सहवास लाभला. दिघे साहेबांचा शिष्य म्हणून या देवीच्या स्थापनेत आमचं देखील योगदान आहे, याचा आनंद होत आहे, असंही ते म्हणाले.
दसरा मेळाव्याची तयारी जय्यत सुरू आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येत आहेत. शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी लोक येत आहेत. दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जेवणाच्या सुविधाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. जवळपास दोन ते अडीच लाख नागरिकांच्या जेवणाची सोय केलेली आहे. दसरा मेळाव्याला येणाऱ्या कार्यकर्त्यांना पौष्टिक आहार देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.