Pravin Darekar : भाजपा हा संस्कारित आणि वेगळ्या विचारधारेवरचा पक्ष; ईडी आणि राजकारणावर प्रवीण दरेकरांचं उत्तर
ईडीच्या भीतीपोटी कुणी भाजपा किंवा शिंदे गटात येवू नये असे एकनाथ शिंदे जे म्हणाले ते बरोबरच आहे. एकनाथ शिंदे यांनी जो विचार केला, तो शिवसेना वाढवण्याचा आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
शिर्डी, अहमदनगर : संजय राऊत (Sanjay Raut) यांना कोण म्हणत आहे शिवसेना सोडा, शिवसेना जरी सोडली तरी तुम्हाला भाजपामध्ये घेणार नाही, असा टोला भाजपा नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी लगावला आहे. शिर्डी साईबाबांच्या दर्शनानंतर संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईविषयी त्यांनी मत व्यक्त केले. संजय राऊत यांची ईडीने तब्बल नऊ तास चौकशी करून नंतर ताब्यात घेतले. त्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. भाजपा सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांनी उलट संजय राऊत यांच्यावरच टीका केली आहे. भाजपा (BJP) हा संस्कारित आणि वेगळ्या विचारधारेवरला पक्ष आहे. मात्र दुसरीकडे संजय राऊत यांना प्रसिद्धीचा मोह आहे. राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवली, असा घणाघात प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
‘कायदेशीर चौकटीत राहून तपास’
महाराष्ट्रातले राजकीय वादळ संपुष्टात आले आहे. अडीच वर्षाच्या कालावधीनंतर महाराष्ट्राचे हित जपणारे शिंदे फडणवीस सरकार राज्यात आले आहे. आलेली संकटे, विघ्ने साईबाबांच्या आशीर्वादाने दूर होतील, असा आत्मविश्वास आहे. ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, त्यांच्या कायदेशीर चौकटीत राहून त्या तपास करत असतात. त्यांना नीट सामोरे जाऊन उत्तरे द्यायला हवीत. शेवटी ज्यांना कर नाही त्यांना डर कशाला, असे दरेकर म्हणाले.
‘ही नौटंकी’
संजय राऊत यांनी बाळासाहेबांची शपथ घेतली, त्यावरही दरेकरांनी टीका केली. संजय राऊतांना बाळासाहेबांची शपथ घेण्याचा नैतिक अधिकार नाही. रामदास कदमांनी सांगितले, की बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देऊन शरद पवारांची विचारधारा स्वीकारली आहे. तेव्हा शरद पवारांचीच शपथ त्यांनी घ्यायला हवी, असे त्यांचेच ज्येष्ठ सहकारी रामदास कदम म्हणाले. राऊतांनी बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचे पाप राऊतांनी केले आणि आता त्यांतीच शपथ घेणे ही नौटंकी आहे, असा हल्ला त्यांनी केला.
प्रवीण दरेकरांची राऊतांवर टीका
भाजपाविषयी…
आपण जेवढे दिवस शिवसेनेत असाल तेवढी लवकर संपेल. प्रसिद्धीचा मोह आवरत नाही, असे ते म्हणाले. भाजपा हा संस्कारित पक्ष, एका वेगळ्या विचार धारेवर बसलेला पक्ष आहे. त्यामुळे ईडीच्या भीतीपोटी कुणी भाजपा किंवा शिंदे गटात येवू नये असे एकनाथ शिंदे जे म्हणाले ते बरोबरच आहे. एकनाथ शिंदे यांनी जो विचार केला, तो शिवसेना वाढवण्याचा आहे, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.