बाळासाहेबांनी नमाजासंदर्भात भोंग्यांवरुन घेतलेली भूमिका देशवासीयांना माहिती, दरेकरांची अजान स्पर्धेवर टीका
बाळासाहेबांनी नमाजासंदर्भात भोंग्यांवरुन घेतलेली भूमिका देशवासीयांना माहिती आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अजान स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या शिवसेनेवर केली आहे.
मुंबई : मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी अजान पठण स्पर्धेचं आयोजन केलं आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवर आज (सोमवार) सकाळपासूनच भाजपने प्रहार केले आहेत. राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्तेसाठी शिवसेनेचा नूर पालटत असल्याची टीका केली आहे. (Pravin Darekar Slam Pandurang Sapkal Shivsena Azan Competition)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वधर्म समभाव सांगत शिवसेनेचा हा अभिनव उपक्रम असल्याचं सपकाळ यांनी सांगितलं होतं. सपकाळ यांनी दिलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या दाखल्यावर दरेकर यांनी आक्षेप घेत सडकून टीका केली. “पांडुरंग सकपाळ यांचे विधान आश्चर्यकारक आहे. शिवसेनेचं बदलतं स्वरुप सत्तेनंतर दिसत आहे. त्यांनी आणखी कहर म्हणजे बाळासाहेबांचा दाखला दिला आहे. बाळासाहेब प्रत्येक धर्म प्यारा बोलले असतील परंतु त्यांची पालखी उचला असं ते कधी बोलले नाहीत. त्यांनी नेहमी त्यांच्या आचार विचारावर टीका केली”, असं दरेकर म्हणाले.
“सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाल्याचे पांडुरंग सकपाळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. मातोश्रीत नमाज पढल्याचा उल्लेख हे मोठं विधान आहे”, असं दरेकर म्हणाले. “पांडुरंग सकपाळ हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत आणि म्हणून संजय राऊत यांनी सत्ता टिकवण्यासाठी आज शिवसेनेच्या मूळ आचार विचाराला तसंच नेतृत्वाला तिलांजली देणारी वाटचाल सुरु आहे हे याचंच द्योतक आहे”, अशा शब्दात दरेकरांनी टीकास्त्र सोडलं.
“बाळासाहेब ठाकरे यांनी नमाजासंदर्भात भोंग्यांवरुन घेतलेली भूमिका तसंच त्यांनी केलेली कडवट टीका देशवासीयांनी पाहिलेली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाचा व देशप्रेमाचा विसर शिवसेनेला महाविकास आघाडी सरकारमध्ये आल्यानंतर सातत्याने पडत चालल्याचे चित्र आहे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.
भाजपला कोणत्याही गोष्टीवरुन राजकारण करण्याची सवय
दरम्यान, अजानच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपवर शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी टीका केली आहे. राजकारण करणाऱ्यांना राजकारण करायचंच असतं. आम्ही कोणताही शब्द वापरला तरी ते राजकारण करतात. हिंदू-मुस्लिमांवर राजकारण करण्याची त्यांची जुनीच सवय. ही सवय जाणार नाही, असं सांगतानाच आमचा हेतू शुद्ध आहे. त्यामुळे आम्ही त्याकडे लक्ष देत नाही, असं सकपाळ म्हणाले.
प्रत्येकाला आपला धर्म प्यारा असतो. त्यावर आमचा विश्वास आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही देशप्रेमी मुस्लिमांची नेहमीच कदर केली आहे. एवढंच नव्हे तर एका मुस्लिम जोडप्याला त्यांनी ‘मातोश्री’त नमाज पठण करण्याची परवानगीही दिली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
(Pravin Darekar Slam Pandurang Sapkal Shivsena Azan Competition)
शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच विधान हे शिवसेनेचं सत्तेनंतरचं बदलतं स्वरूप स्पष्ट करणारं विधान आहे.यात कहर म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचा दाखला त्यात देण्यात आला आहे. यांनी सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेच्या मूळ आचारविचाराला तिलांजली देणारी वाटचाल सुरु केली आहे.@OfficeofUT pic.twitter.com/EcS41q2On0
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) November 30, 2020
संबंधित बातम्या
शिवसेनेने आता फक्त हिरवा झेंडाच खांद्यावर घेणं बाकी आहे; भाजपची खोचक टीका
लहान मुलांसाठी शिवसेनेची अजान स्पर्धा, अजानला विरोध करणं गैर: पांडुरंग सकपाळ