नादाला लागू नका, ठोशास ठोसा उत्तर देऊ, प्रवीण दरेकरांचा इशारा
संविधानाचा गळा घोटण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्यालाही आम्ही सोडणार नाही. हा सविनय कायदेभंगाचा कार्यक्रम आहे, असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलं.
सिंधुदुर्गः आमच्या नादाला लागू नका. आम्ही ठोशास ठोसा उत्तर देऊ शकतो. पण भाजपमध्ये आल्यानंतर राणेंनी (Narayan Rane) संविधानानुसार काम केलंय. हे लक्षात ठेवा, असा इशारा भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिलाय. सिंधुदुर्गात (Sindhudurg) आज भाजपच्या वतीने संविधानाच्या समर्थनार्थ मोठी रॅली काढण्यात आली. या रॅलीत प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार निलेश राणे आदी उपस्थित होते. यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी शिवसेनेच्या कुडाळ शाखेला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, देशाचं संविधान पुढे नेण्याचं काम आज भाजप करतेय. ज्या काँग्रेसनं आणीबाणी लावली, त्याच्या मांडीला मांडी लावून वैभव नाईक आणि भास्कर जाधव बसणार आमच्यावर आणीबाणीचे आरोप करणार? संविधान तुम्ही पायदळी तुडवणार आणि आम्हाला दोषी धरणार? असा सवाल दरेकर यांनी केला.
तुम्ही संविधान पायदळी तुडवत असाल तर आक्रमकपणे जशास तसं उत्तर देण्याचा अधिकार आम्हाला दिला आहे. ठोशास ठोसा द्यायला राणेंना फार काही सांगावं लागत नाही. पण भाजपात आल्यानंतर आम्ही संविधान बरोबर घेऊन चालत आहोत. म्हणून त्यांनी चिपळूणमध्ये काही केलं नाही. फक्त एक संदेश दिला, असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलं.
पाहा दरेकर यांचं भाषण-
आम्ही संविधान पाळणारे आहोत, असा संदेश त्यांनी दिलाय. संविधानाचा गळा घोटण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्यालाही आम्ही सोडणार नाही. हा सविनय कायदेभंगाचा कार्यक्रम आहे.
भास्करचा सूर्यास्त जवळ आलाय. तर वैभव नाईकांचा शेवट आहे. कुडाळमध्ये भाजपाचं वैभव पुन्हा उदयास येईल. चिखलातून कमळच उगवणार असल्याचं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलंय.