‘नशीब, मुख्यमंत्री स्वतःचं गुणगान ‘गात’ नाहीत’, अमृता फडणवीसांना शिवसेनेचं उत्तर
प्रियंका चतुर्वेदींच्या उत्तराला मिसेस फडणवीसांनी उत्तर दिल्यास काय 'ट्विटरवॉर' रंगणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
मुंबई : ठाकरे आडनावाला जागण्यावरुन माजी मिसेस मुख्यमंत्री अर्थात अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका त्यांच्याच अंगलट येण्याची चिन्हं आहेत. ‘नशीब, मुख्यमंत्री स्वतःचं गुणगान ‘गात’ नाहीत’ अशा शब्दात शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीसांना (Shivsena on Amruta Fadnavis) सुनावलं.
‘होय, ते आपल्या आडनावाला जागत आहेत, पण तुम्ही नेहमीप्रमाणे बातम्या पाहिल्या नाहीत. आश्वासनांची पूर्तता, मूलभूत वचनबद्धता आणि जनतेच्या कल्याणासाठी कटिबद्ध, शेतकऱ्यांना कर्जमाफी, 10 रुपयात थाळी, प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय, आणि हे सर्व सरकार स्थापनेच्या एका महिन्यात. ता. क. नशीब, ते स्वत:चे गुणगान ‘गात’ नाहीत’ असं उत्तर प्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटला कोट करुन दिलं आहे.
अमृता फडणवीसांना शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या उत्तर देतील, असं काल शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते. थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव घेत टीका केल्याने सर्वसामान्य शिवसैनिकांपासून नगरसेवकांनी मिसेस फडणवीसांवर प्रतिहल्ला चढवला होता. आता प्रियंका चतुर्वेदींच्या उत्तराला मिसेस फडणवीसांनी उत्तर दिल्यास काय ‘ट्विटरवॉर’ रंगणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
Yes he is living up to his surname, but you as usual missed the news-promises fulfilled,principled commitment&working for welfare of his people-farmer loan waiver,₹10 meal,CM office in every div.All this in a month of forming govt PS:Thankfully not into ‘singing’ his own praises https://t.co/V7LZZzC2zB
— Priyanka Chaturvedi (@priyankac19) December 23, 2019
काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानावरुन ट्विटरवर टीका केली होती. ‘राहुल गांधी यांचं वक्तव्य निंदनीय आहे! वीर सावरकर आणि त्यांची महानता किंवा सत्कार्यांच्या जवळपासही राहुल गांधी पोहचत नाहीत. इतकंच नव्हे, तर त्यांनी स्वत:ला ‘गांधी’ समजण्याची चूकही करु नये! कोणीही गांधी आडनाव लावून ‘गांधी’होऊ शकत नाही!’ असं ट्वीट फडणवीसांनी केलं होतं.
अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून कोण उत्तर देणार? संजय राऊत म्हणतात…
देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट कोट करुन अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. “खरं आहे देवेंद्र फडणवीसजी. त्याचप्रमाणे ठाकरे आडनाव लावल्याने कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं. एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते,” असं ट्वीट करत अमृता फडणवीसांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना टॅगही केलं होतं.
याआधीही अमृता फडणवीस यांनी आरे कारशेडसाठी वृक्षतोडीला दिलेल्या स्थगितीवरुन शिवसेनेला टोला लगावला होता. औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी झाडं कापण्यात येणार आहेत, अशा आशयाची बातमी एका वृत्तपत्रात छापून आली होती. या बातमीचा फोटो अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. “शिवसेना ही ढोंगी आहे. आपल्या सोयीप्रमाणे ते झाडांच्या कत्तलीला विरोध करतात. तसेच शिवसेना कमिशनखोर आहे. त्यांचा ढोंगीपणाचा आजार लवकर बरा होवो,” असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर प्रियांका चतुर्वेदी आणि अमृता फडणवीस यांच्यात ट्विटरवॉर (Shivsena on Amruta Fadnavis) रंगला होता.