Supriya Sule :…म्हणून शरद पवार यांनी राजीनामा दिला…; छगन भुजबळांच्या दाव्याची सुप्रिया सुळेंकडून चिरफाड
Bararmati MP Supriya Sule on Chhagan Bujbal : मला अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता, पण... ; भाजपसोबत जाण्याच्या छगन भुजबळांच्या 'त्या' दाव्यावर सुप्रिया सुळे यांचं स्पष्ट भाष्य. शरद पवार यांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...
योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी पुणे | 12 ऑक्टोबर 2023 : ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार यांनी राजीनामा का दिला, असावा याविषयी चर्चा रंगली. मंत्री छगन भुजबळ यांनी काल टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले. यात त्यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी छगन भुजबळ यांचे सगळे दावे फेटाळले आहेत. शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हा काय घडलं? छगन भुजबळ यांच्या दाव्यात किती तथ्य आहे? यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता. पण या लोकांना भाजपसोबत जायचं आहे, हे लक्षात आल्यामुळे शरद पवार नाराज झाले. नाराज होऊन त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. एकीकडे अजितदादाच्या गटातील लोक म्हणतात, की पवारसाहेब हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवतात. पण जेव्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा पवार साहेबांनी कमिटी नेमली. मग ही हुकुमशाही कशी होऊ शकते? यावेळी उलट छगन भुजबळांनी आग्रह केला होता. की कमिटी वगैरे काही नको. तुम्हीच कमिटी अन् सारं काही. तुम्हीच अध्यक्ष राहा, राजीनामा मागे घ्या. त्यामुळे पवारसाहेबांवर केले जाणारे मुद्दे कसं खोटे आहेत. हे यांच्या वक्तव्यातून दिसून येतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
मला अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता. पण मी अध्यक्ष झाल्यावर भाजपसोबत जाण्याचा निर्णय करणार होते, असं भुजबळ म्हणत आहेत. पण मला ते अशक्य होत. ते मी कदापि केलं नसतं. मी माझ्या वैचारिक भूमिकेशी ठाम होते. मी भाजपसोबत गेले नसते. त्यामुळे ते जे काही बोलत आहेत. ते खरं नव्हे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जेव्हा शरद पवार यांनी राजीनामा दिला. तेव्हा सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याचं ठरलं होतं. सुप्रिया सुळे या अध्यक्ष झाल्यानंतर राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती तसं ठरलं होतं. 15 दिवस शरद पवारांच्या घरात चर्चा झाली. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत जायचं ठरलं होतं, असं म्हणत छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. याला आता सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे.