पुण्यात भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटणार, शैलेश टिळक उपस्थित राहणार का?
आम्ही भाजापाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं की दुखाःतून सावरायला वेळ लागेल. मात्र आजपासून आम्ही तयारीला सुरुवात करतोय, अशी प्रतिक्रिया कुणाल टिळक यांनी दिली आहे.
प्रदीप कापसे, पुणेः पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (By Election) भाजपने (BJP) जोरदार तयारी केली आहे. आज काही वेळातच भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. कसबा पेठेतून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घराण्यातून उमेदवारी न दिल्यामुळे भाजपवर टिळक कुटुंबियांची नाराजी होती. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी ती उघड बोलूनही दाखवली होती. टिळक घराण्याची नाराजी भाजपाला आव्हानात्मक ठरू शकते, असे म्हटले जात होते. त्यामुळे भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांच्या प्रचारात टिळक कुटुंबाची साथ असेल का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, टिळक कुटुंबीय या प्रचारात शामिल होणार आहेत.
केसरीवाड्यातून फुटणार प्रचाराचा नारळ
संपूर्ण केसरीवाडा भाजपविरोधी भूमिका घेतो की काय अशी शक्यता होती. मात्र भाजपने टिळक कुटुंबियांची समजूत काढल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या पदयात्रेत आजपासून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक सहभागी होणार आहेत.
हेमंत रासणे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर शैलेश टिळक यांनी मनातील खंत माध्यमांसमोर बोलून दाखवली होती. मुक्ता टिळक यांच्या पक्षनिष्ठेवर हा अन्याय असल्याचं ते म्हणाले होते. हेमंत रासणे यांचा उमेदवारी अर्ज भरताना शैलेश टिळक गैरहजर होते. मात्र त्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे.
केसरीवाड्यातून सुरुवात
पुण्यातील केसरीवाड्यातून भाजपच्या प्रचाराला सुरुवात होत आहे. सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फुटणा र आहे. मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांनी माध्यमांशी बातचित केली.
कुणाल टिळक म्हणाले…
आम्ही आजपासून प्रचारात सहभागी होणार आहोत. नाराजीचा विषय आता मागे पडला आहे. पक्षात काही भविष्य आहे म्हणून कामाला लागलो असं नाही तर कार्यकर्ता म्हणून काम करतच असतो. तसाच यापुढेही करणार, असं आश्वासन कुणाल टिळक यांनी दिलंय.
कसब्यात भाजपचा विजय निश्चित आहे. निवडणुकीच्या प्रचाराला दिवस कमी आहेत. त्यामुळे घरोघरी जाऊन प्रचार करावा लागेल. आम्ही भाजापाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं की दुखाःतून सावरायला वेळ लागेल. मात्र आजपासून आम्ही तयारीला सुरुवात करतोय, अशी प्रतिक्रिया कुणाल टिळक यांनी दिली आहे.