“अनिल देशमुख हे आरोपी, पण जेलमधून जाऊन आल्यानंतर शहीद झाल्यासारखं बोलतायत”
Ram Shinde on Anil Deshmukh : ईडीची चौकशी आणि अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा घणाघात
पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची परवा ईडी चौकशी झाली. त्यावर विविध प्रतिक्रिया विविध प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दोन वर्षांपूर्वी भाजप प्रवेशासाठी दबाव होता, असा खुलासा अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यावर भाजपची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अनिल देशमुख काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी माझ्याकडे प्रस्ताव आले. तेव्हाच जर मी तडजोड केली असती तर माझ्यावर ईडीची कारवाई झाली नसती. पण दोन वर्षापूर्वीच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं. पण मी तडजोड केली नाही, असं अनिल देशमुख म्हणालेत.
राम शिंदे म्हणाले…
भाजप नेते राम शिंदे यांनी अनिल देशमुख यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख हे एक आरोपी आहेत, ते जेलमधून जाऊन आल्यानंतर शहीद झाल्यासारखं बोलतायत. ते गृहमंत्री होते मग त्याचवेळी त्यांनी बोलायचं होतं ना, असं राम शिंदे म्हणालेत.
ईडी त्याच्या पद्धतीने काम करत असते. जर तुम्ही काही केलं नसेल तर घाबरायची गरज नाही. सामनात लिहणाऱ्या संजय राउतांना पण नोटीस आली होती. भाजपला दोष देण्यात काही अर्थ नाही.भाजप कुणावर दबाव टाकत नाही, असं म्हणत राम शिंदे यांनी सामनाच्या आजच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार कधी?
मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचं बोललं जातंय. त्यावरही राम शिंदे बोललेत. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. मात्र मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपमध्ये कुठेही नाराजी नाहीये, असं राम शिंदे म्हणालेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुकडीच्या पाण्याचं नियोजन करण्यात आलं नाही. आमच्या सरकारच्या काळात आम्ही पाणी सोडण्याचं नियोजन करत असताना राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके मात्र त्याला विरोध करत असून आमच्या लोकांना वेठीस धरत आहेत, असा घणाघातही त्यांनी केलाय.
रोहित पवारांवर टीकास्त्र
कुकडीच्या पाण्यावरून भाजप नेते राम शिंदे यांची रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे. रोहित पवार फक्त सोशल मीडियावर असतात. रोहित पवारांनी माझा फोटो कट करून 22 तारखेला पाणी सोडणार असं बैठकीचा फोटो ट्विट केला होता. मग आता पाणी सोडलं नाही त्यावर का बोलत नाही. ते राहतात पुण्यात, पुण्याच्या लोकांचं लांगुलचालन करतात आणि मतदारसंघातील लोकांना वेठीस धरतात. त्यांच्याच पक्षातील आमदारांनी विरोध केल्यामुळे त्यांची अडचण झालीय, असं म्हणत शिंदे यांनी घणघात केलाय.
राधाकृष्ण विखे पाटील माझ्यातील वादावर आता पडदा पडलाय, मी पक्षातील वरिष्ठांना सांगितलं आहे त्यांनी सांगितलं आहे.