‘हा’ तर भाजपचा आवडता धंदा!; जयंत पाटील यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया
SC on cm eknath shinde disqualification case : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल, जयंत पाटील यांना आलेली ईडीची नोटीस; सुषमा अंधारे यांची सविस्तर प्रतिक्रिया
पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आज ईडीची नोटीस आलेली आहे. त्यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच राज्यातील सत्तासंघर्षावर आज निकाल येणार आहे. या निकालात सर्वोच्च न्यायालय नेमकं काय म्हणतं. त्यांचा निर्णय काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यावरही सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील यांना आलेल्या नोटीस संदर्भात दोन अर्थ निघतात. एकतर कर्नाटक निवडणूक झाल्यानंतर आज निकालाची वेळ ठरणं. ज्यावेळी शरद पवारांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी सर्वात पहिला तीव्र आक्षेप हा जयंत पाटलांनी नोंदवला होता. जे लोक पक्ष बांधून ठेवण्याची जास्त भूमिका घेतात, अशा लोकांना त्रास देणे हा भाजपचा अत्यंत आवडता धंदा झाला आहे. ह्या ईडीच्या नोटीसकडे आम्ही फक्त सूडबुद्धीची कारवाई म्हणून पाहतो. ईडीसारखी जी स्वायत्त यंत्रणा आहे. आता भाजपच्या मर्जीत राहून काम करते. हे आता अगदी शाळकरी मुलांना देखील समजलं आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
सर्वोच्च न्यायलयाच्या निकालावर सुषमा अंधारे म्हणतात…
निकाल काहीही आला तरी आम्ही त्याचं स्वागत करू. आज येणारा निकाल काय येतो हे पाहणं महत्वाचं आहे. हा एक माईलस्टोन आहे.संपूर्ण देशाच्या न्यायव्यवस्थेच्या संबंधाने अभ्यासकांच्या संबंधाने तसेच आयाराम गयाराम करत सतत सत्तेच्या खुर्चीच्या मागे धावाधाव करणारे अशा सर्वांसाठी हा निकाल एक लँडमार्क असणार आहे, असं सुषमा अंधारे म्हणाले आहेत.
या निकालाच्या निमित्ताने या देशात लोकशाही जिवंत आहे किंवा नाही याचा सुद्धा निकाल आज लागणार आहे. आम्ही ठरवलं आहे येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायचं. आगामी निवडणुकांना अजून आठ-दहा महिने वेळ आहे. लोकांमध्ये जाऊन भूमिका मांडणे हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्यात.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या निणर्यामध्ये केंद्र सरकारला मोठा झटका दिला आहे. दिल्लीतल्या सेवा दिल्ली राज्यसरकारच्या अधीन राहतील, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनाला सुरुवात झाली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून वाचन सुरु झालं आहे.