“देवेंद्र फडणवीस हे गृहखात्याला लागलेले कलंक, अनेक प्रकरणं हाताळण्यात अपयशी”
Sushma Andhare on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस खुर्ची सांभाळण्यात व्यस्त, त्यांची गृहखात्यावरचा पकड सुटत चाललीये; कुणाचं टीकास्त्र
पुणे : उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘नागपूरला लागलेला कलंक’,असा उल्लेख केला. त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. भाजपने ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्याला ठाकरे गटानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘कलंक’ असा केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांची गृहखात्यावरची पकड सुटत चालली आहे. पोलिसांना सध्या कोणतंच प्रकरण हाताळता येत नाहीये. गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रातील अनेक प्रकरण सांभाळण्यात ते अपयशी ठरत आहेत. देवेंद्र फडणवीस हे गृहखात्याला लागलेले कलंक आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जातो हा कलंक नाही का? महिला असुरक्षित आहेत हा कलंक नाही का एवढा कलंकितपणा करूनही देवेंद्रजींना मुख्यमंत्रिपद मिळत नाही. आता अजित पवार यांच्यासारखी हुशार व्यक्ती आता त्यांच्याकडे आली आहे. ते मुख्यमंत्री होतील. अजितदादांना शुभेच्छा!, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
सत्ता ही सध्या मुजोऱ्यांच्या हातात आहेत. उपमुख्यमंत्री असणारे राज्याचे गृहमंत्री सध्या खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहेत. केंद्राची मर्जी त्यांना राखायची आहे. देवेंद्र फडणवीस यांचा सगळा वेळ आमदार फोडण्यात चालला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. सत्ताधारी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करू शकतात. पण खरंच घटना खरी असेल तर आम्ही बघू चेक करू अशी उत्तरं मिळतात. नितेश राणे यांनी तृतीयपंथीयांबाबत केलेल्या वक्तवाने त्यांचे संस्कार दाखवले. आज बंड गार्डन पोलिसांनी कळस केला आहे. तृतीयपंथीयांना ओढत घेऊन गेले. नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालच पाहिजे, असं सुषमा अंधारे म्हणाल्यात.
आम्हाला न्याय द्या, अशी मागणी करणं हा देवेंद्र फडणवीस यांच्या काळात गुन्हा ठरत आहे. सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर पोलिस काम करत आहेत. जो कोणी विरोधक असेल त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असंही यावेळी सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर चांगली गोष्ट आहे. त्यांची प्रशासनावर पकड चांगली आहे. हुशार माणूस मुख्यमंत्री होणार असेल चांगली गोष्ट आहे, असं त्या म्हणाल्या.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विसरले आहेत की 90 दिवसांचा वेळ संपला आहे. जो वेळ लागतोय. त्यावर असं दिसतंय अजित पवार मुख्यमंत्री होतील. तेच आता मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. असं स्पष्ट दिसतंय, असं विधान सुषमा अंधारे यांनी केलंय.