पुसदमध्ये सख्खे भाऊ एकमेकांविरोधात लढवणार निवडणूक; कसा असेल राजकीय संघर्ष?
पुसद हा महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वपूर्ण मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ नाईक घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याच नाईक कुटुंबात उभी फूट पडली आहे. इंद्रनील आणि ययाती नाईक हे सख्खे बंधू एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याच्या आधीपासून ते आतापर्यंत एकाच घराण्यातला आमदार निवडून येणारा मतदारसंघ म्हणजे पुसद विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून 1952 पासून आतापर्यंत सलग नाईक घराण्यातील आमदार विधानसभेवर निवडून येतोय. त्याचप्रमाणे एकाच घरातून राज्याला दोन मुख्यमंत्रीसुद्धा याच मतदारसंघातून मिळाले आहेत. पुसद विधानसभा मतदारसंघ हा नाईकांचा बालेकिल्ला मानला जातो. आजवर या मतदारसंघात काका-पुतण्या, चुलत भाऊ यांच्यात लढाई पहायला मिळाली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत थेट दोन सख्ख्या भावांमध्ये लढत होणार आहे. निवडणुकीच्या आखाड्यात नाईक बंधूंनी एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाईक कुटुंबात आता उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहरराव नाईक यांच्या दोन्ही मुलांनी एकमेकांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात मतांचं विभाजन होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बदललेल्या राजकीय समीकरणानंतर पुसद विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कशी असेल, कोणामध्ये लढत होईल, इथलं राजकीय गणित काय म्हणतंय, ते जाणून घेऊयात.. ...