RR आबांकडून डान्सबारविरोधी कायदा, मनजितसिंग म्हणाला, ‘आता आमदारांच्या बायकांनाच नाचवू’, ‘भाऊ-आबांनी’ त्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला!
आजपर्यंतच्या गाजलेल्या गृहमंत्र्यांपैकी एक म्हणजे कै. आर. आर. पाटील... संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना आबा या लाडक्या नावाने ओळखतो... आबांच्या आयुष्यातील एक गाजलेला प्रसंग म्हणजे डान्सबारवरील बंदी...!
अक्षय आढाव, टीव्ही 9 मराठी, मुंबई : आजपर्यंतच्या गाजलेल्या गृहमंत्र्यांपैकी एक म्हणजे कै. आर.आर. पाटील… संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना आबा या लाडक्या नावाने ओळखतो… आबांच्या आयुष्यातील एक गाजलेला प्रसंग म्हणजे डान्सबारवरील बंदी… आबांनी एकदा स्वतः एका बारवर छापा टाकला… तेथे त्यांना 17 कोटी रुपये मिळाले… त्याच दिवशी आबांनी हर्षवर्धन पाटलांना फोन केला आणि उद्या सकाळी 11 वाजता आपल्याला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं असं सांगितलं… अर्थात विषय होता डान्स बारवरील बंदी…!
डान्सबारमुळे तरुण वाममार्गाला लागतात, आबांनी जाणलं आणि ठरवलं, कायदा करायचाच!
डान्सबारमुळे अनेक तरुण वाममार्गाला लागतात… एवढंच नव्हे तर अनेकांचे संसार पण उध्वस्त होतात… अनेकांनी जमिनी विकून त्यातून आलेला पैसा बारमध्ये बारबालांवर उधळला… स्वतःचा संसार आणि आयुष्य उद्ध्वस्त करुन घेतलं… अशा डान्सबारवर बंदी घालणं आवश्यक होतं…
डान्सबारवर बंदी घालायचीच, असा निश्चय गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केला होता… संसदीय कार्य मंत्री या नात्याने हर्षवर्धन पाटील यांची भूमिका देखील या प्रकरणात तितकीच महत्त्वाची होती… कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेताना त्यांचं मत ‘असा कायदा तयार करता येणार नाही’, असं होतं… परंतु आर. आर. आबा आणि हर्षवर्धन पाटील हे डान्सबारवर बंदी घालण्यासाठी इरेला पेटले होते…
विधिमंडळाकडून डान्सबारविरोधी विधेयक पारित!
यासाठी हर्षवर्धन पाटलांनी विधिमंडळ नियमावलीच्या पुस्तकाची पानन्-पानं चाळली होती…. डान्सबार बंदीचा कायदा करताना, त्याचे ड्राफ्ट बनविताना हर्षवर्धन पाटलांना या विधिमंडळ नियमावलीच्या पुस्तकाचा खूप फायदा झाला… सभागृहात डान्सबार विरोधी विधेयक मांडण्यात आलं आणि विधिमंडळाने हे विधेयक पारित केलं…
चिडलेल्या मनजितसिंगचं विधिमंडळाला आव्हान!
परंतु सरकारच्या निर्णयाविरोधात सर्व डान्सबारवाले उच्च न्यायालयात गेले… त्यामुळे सरकारला सर्वोच्च न्यायालयात अपीलात जाणं भाग पडलं… पण दुर्दैवानं तिथेही सरकारला यश आलं नाही… त्यावेळी मनजितसिंग सेठी हे बार संघटनेचे अध्यक्ष होते… त्यांचे स्वतःचे मुंबईत जवळपास 35 बार होते… सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या विरोधात निकाल दिल्यानंतर मनजितसिंग सेठी यांनी असं विधान केलं की, “कायदा तर आम्ही रद्द करुन घेतलाच, आता आम्ही आमदार आणि मंत्र्यांच्या बायकांनाच नाचवू…”
मनजितसिंगला धडा शिकवायचा, भाऊ-आबांचा निश्चय…!
मनजितसिंगचे हे विधान विधिमंडळाचा अवमान करणारे होते… हर्षवर्धन पाटलांच्या हे लक्षात आल्यानंतर ते मनातून फार अस्वस्थ झाले… दुसऱ्या दिवशी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री या नात्याने आर. आर. पाटील यांच्या कानावर ही बाब घातली… मनजितसिंग शेट्टीच्या विधानाचं काय करायचं? असं हर्षवर्धन पाटलांनी विचारल्यानंतर ‘दुर्लक्ष करायचं’ या मतावर बाबा (पृथ्वीराज चव्हाण) ठाम होते… पण हर्षवर्धन पाटलांचं मन त्यावेळी काहीतरी वेगळं सांगत होतं… त्यांना धडा शिकवायचा असा निश्चय हर्षवर्धन पाटलांनी केला… हर्षवर्धन पाटलांना साथ लाभली आर. आर. आबांची…!
हर्षवर्धन पाटील यांनी हक्कभंगाचा ड्राफ्ट लिहून भाजपच्या आमदारांना दिला आणि हा ड्राफ्ट विधिमंडळात ठेवून तो सर्वानुमते मंजूर करत हक्कभंग प्रस्ताव समितीचे अध्यक्ष स्वर्गीय चंद्रकांत छाजेड यांना पाठवला… त्यांनाही सांगितलं की या ठरावाचा निर्णय फक्त दोनच सुनावणीमध्ये द्यायचा आहे… तिसऱ्या सुनावणीला निकाल द्यायचा… ठरल्याप्रमाणे मनजितसिंगला हक्कभंगाची नोटीस पाठवली गेली… पण पहिल्या सुनावणीवेळी मनजितसिंग स्वतः न येता त्यांनी त्यांचा वकील पाठवला मग त्यांना सभागृहाने नोटीस पाठवली की, ‘वकील न पाठवता तुम्ही स्वतः हजर राहा…!’
भाऊ-आबांनी मनजितसिंगचा करेक्ट कार्यक्रम केला!
सभागृहाला हक्कभंगाच्या प्रकरणात कमीत कमी एक दिवस व जास्तीत जास्त तीन दिवस शिक्षा सुनावण्याचा अधिकार असतो… दुसऱ्या सुनावणीनंतर हक्कभंग समितीने मनजितसिंग विरोधात कार्यवाहीसाठी ती नोटीस पोलीस प्रशासनाकडे पाठवली… पोलीस प्रशासन अगोदरच सज्ज ठेवले होते… साध्या वेषात लक्ष ठेवणारे पोलीस त्यांच्या घराच्या आजूबाजूला होते… पोलिस अधिकाऱ्यांनी हातात आदेश येताच म्हणजेच मनजितसिंगच्या घरी जाऊन त्याला अटक केली… ही अटक जाणीवपूर्वक शुक्रवारी केली… कारण शुक्रवार जोडून सलग सुट्ट्या येतात… त्यामुळे मनजितसिंगला काहीच करता आले नाही… तीन दिवसांच्या ऐवजी त्याला आर्थर रोड कारागृहातील चार दिवसाची जेलची हवा खावी लागली…!
(R R Patil And Harshavardhan Patil law Against Dance Bar Special Story)
हे ही वाचा :