Ajit Pawar NCP : राज्यात मोठी राजकीय खेळी, फुटीमागे राहुल गांधी यांचे कनेक्शन काय?
Ajit Pawar NCP : महाराष्ट्रात मोठा राजकीय डाव टाकण्यात आला आहे. राष्ट्रवादीतील या फुटीची कारणमीमांसा करण्यात येत आहे. अनेक पदर या फुटीमागे असल्याचे बोलण्यात येत आहे.
नवी दिल्ली : एकीकडे विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात दंड थोपाटले आहेत. मोदी सरकारचा 2024 मध्ये पाडव करण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्यात येत आहे. तर मुंबईत आज 2 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठा डाव टाकला. त्यांच्या या राजकीय चालीमुळे विरोधकांच्या एकजुटतेच्या मोहिमेला मोठा सुरुंग लागला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा ही सांगितला. तसेच सर्वच वरिष्ठांचा आपल्याला आशिर्वाद असल्याचा आत्मविश्वास त्यांनी दाखवला. अर्थात शरद पवार (Sharad Pawar) यांनी घर फुटलं असं मानत नसल्याचे सांगितले. पण या पक्ष फुटीमागे राहुल गांधी यांचं काय कनेक्शन असेल बरं?
एक वर्षांपासून धुसफूस गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादीत धुसफूस असल्याचे दिसून आले. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भूमिकेपेक्षा अनेकदा वेगळी भूमिका घेतली आहे. यापूर्वी त्यांनी भाजपसोबत घरोबा केला होता. पहाटेच्या शपथविधीने त्याला दुजोरा दिला. महाविकास आघाडीत असताना ही अनेकांना राष्ट्रवादी फुटीची भीती अधिक होती. पण गेल्यावर्षी शिवसेनेला खिंडार पाडण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आले. त्याचे किस्से ही त्यांनी सांगितले आहे.
ईडीचा जाच ईडी, सीबीआयसह इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या पाठिमागे लागला आहे. त्यात नवाब मलिक तर अजूनही तुरुंगात आहे. अनिल देशमुख काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आले आहेत. आता भाजपसोबत केलेल्या काही नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी जेरीस आणण्याचे प्रयत्न केल्याचे दिसले. त्यामुळेच राष्ट्रवादीत काही जण शिवसेना-भाजप सोबत जाण्याच्या तयारीत होते.
पवार यांच्या राजीनाम्याचे गणित शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करुन पक्षातील हे बंड शमविण्याचा प्रयत्न केला. कार्यकारी अध्यक्ष निवडण्यात आले. पण याचा म्हणावा तसा परिणाम झाला नाही. पक्षाचीच भाकरी फिरवल्या गेली. पण यामुळे देश पातळीवर विरोधी मोट बांधण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला.
राहुल गांधी विरोधकांचा चेहरा विरोधी पक्षांनी मोट बांधण्यासाठी पाटणा येथे बैठक घेतली. या बैठकीत लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले. नवरदेव व्हा, आम्ही वऱ्हाडी व्हायला तयार असल्याचे सूचक वक्तव्य लालू प्रसाद यादव यांनी केले होते. राहुल गांधी यांनी आता विरोधी पक्षाचे नेतृत्व स्वीकारानवे आणि जबाबदारी खाद्यांवर घ्यावी असा सल्ला यादव यांनी दिली होता. लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी हेच विरोधकांचा चेहरा असतील, असे सूचक वक्तव्य होते. म्हणजे पंतप्रधान पदाचा उमेदवार राहुल गांधी असतील हे जवळपास निश्चित मानण्यात येत आहे.
काँग्रेस सोबत नको राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना हा अर्थ कळून चुकला. अनेक नेत्यांचा काँग्रेस सोबत जाण्यास विरोध होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकीय पटलावरील घडामोडीत स्पष्ट भूमिका घेण्यासाठी राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचे निश्चित केले. त्यानंतर आज त्यांनी कृतीतून केवळ काँग्रेसलाच नाही तर विरोधी खेम्याला पण हादरा दिला.