Rahul Gandhi : रुपया का गेला 80 पार, 45 वर्षात का सर्वाधिक बेरोजगार?; राहुल गांधी म्हणतात, राजा को 10 सवाल
Rahul Gandhi : माझ्या प्रश्नांची यादी मोठी आहे. पण पंतप्रधानांनी माझ्या केवळ दहा प्रश्नांची उत्तरे द्यावीत. काँग्रेस पक्षाला धमकावल्याने तुम्ही जबाबदारी ढकलू शकत नाहीत. आम्ही जनतेची आवाज आहोत आणि प्रश्न विचारत राहू, असं राहुल गांधी म्हणाले.
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला (central government) धारेवर धरले आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांना थेट दहा सवाल केले आहेत. दोन कोटी रोजगार देणार होतात त्याचं काय झालं? डॉलरच्या तुलनेत रुपया 80 पार कसा गेला? देशातील तरुणांना केवळ चार वर्षासाठी लष्करात भरती होण्यासाठी का जबरदस्ती केली जात आहे? असे सवाल राहुल गांधी यांनी मोदींना विचारले आहेत. संसदेत गोंधळ सुरू असतानाच राहुल गांधी यांना या दहा मुद्द्यांकडे मोदींचं लक्ष वेधायचं होतं. तसेच या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणायची होती. मात्र, मोदी सरकारची हुकूमशाही दिसून आली. त्यांनी 57 खासदारांना पकडायला सांगितलं आणइ 23 खासदारांना निलंबित करण्यात आलं. जे प्रश्न मला संसदेत विचारू दिले नाही ते आता मी देशाच्या राजाला विचारत आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
माझ्या प्रश्नांची यादी मोठी आहे. पण पंतप्रधानांनी माझ्या केवळ दहा प्रश्नांची उत्तरे द्यावीत. काँग्रेस पक्षाला धमकावल्याने तुम्ही जबाबदारी ढकलू शकत नाहीत. आम्ही जनतेची आवाज आहोत आणि प्रश्न विचारत राहू, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींचे दहा सवाल
>> गेल्या 45 वर्षातील आज सर्वाधिक बेरोजगारी का आहे? दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देणार होतात, त्याचं काय झालं?
>> जनता रोज जगण्यासाठी संघर्ष करत आहे. असं असताना दही, धान्यासारख्या खाण्यापिण्याच्या गोष्टीवर जीएसटी का लावत आहात? त्यांचं दोन वेळेचं अन्न का हिरावलं जात आहे?
>> खाद्य तेल, पेट्रोल- डिझेल आणि गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातून जनतेला कधी दिलासा मिळणार?
>> डॉलरच्या तुलनेत रुपयाची किमत 80 रुपयांच्या पार का गेली?
>> गेल्या दोन वर्षात लष्करात एकही भरती केली नाही. आता अग्निपथ योजना का आणली गेली आहे. तरुणांना चार वर्षाच्या कंत्राटावर अग्निवीर बनण्यासाठी का मजबूर केलं जात आहे.
>> लडाख आणि अरुणाचल प्रदेशात चीनचे सैन्य आमच्या हद्दीत घुसले. तुम्ही गप्प का आहात? तुम्ही काय करत आहात?
>> पीक विम्यातून इन्श्यूरन्स कंपन्यांना 40 हजार कोटींचा फायदा करून दिला. पण 2022 पर्यंतच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचं वचन पाळलं नाही.
>> शेतकऱ्यांना योग्य एमएसपी देणार होता. त्याचं काय झालं? शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई अजून का दिली नाही?
>> ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात 50 टक्क्यांची सवलत मिळत होती. ती बंद का करण्यात आली? तुमच्या प्रचारावर तुम्ही एवढा खर्च करू शकता तर ज्येष्ठ नागरिकांना थोडीशी सवलत देऊ शकत नाही का?
>> 2014मध्ये केंद्र सरकारवर 56 लाख कोटींचं कर्ज होतं. ते आता वाढून 139 लाख कोटी झालं आहे. मार्च 2023पर्यंत हे कर्ज 156 लाख कोटी होणार आहे. तुम्ही देशाला कर्जात बुडवणार आहात का?