काँग्रेसने याआधीही यात्रा केल्यात की… परिवर्तन घडलं? इतिहास काय सांगतो?
काँग्रेसच्या इतिहासात सर्वात मोठी यात्रा राहुल गांधींनी सुरु केलीय. 3570 किमी अंतर म्हणजे देशातल्या बहुतांश भागातून ते फिरणार. काँग्रेस नेतेही उत्साहात आहेत. त्यामुळे यातून काँग्रेसला संजीवनी निश्चित मिळेल, अशी अपेक्षा केली जातेय.
नवी दिल्लीः राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेकडे अवघा देश डोळे लावून बसलाय. अभी नही तो कभी नही म्हणत एकिकडे सोशल मीडियावर मोहीम सुरु झालीय. तर दुसरीकडे खरंच परिवर्तन घडणार का, असा प्रश्न विचारला जातोय. खरं तर काँग्रेसचं पदयात्रा पॉलिटिक्स जूनं आहे. स्वातंत्र्यानंतर फोफावलेल्या काँग्रेसला मध्यंतरी ब्रेक लागला. तेव्हा राजीव गांधी यांनी यात्रा काढल्या होत्या. काही प्रमाणात आणि ठराविक ठिकाणी परिणामही दिसले. आता तर पक्ष खूप आखुडलाय. त्यामुळे इतिहासात डोकावून काही आडाखे बांधता येतील.
राजीव गांधींच्या दोन यात्रा
1985 मध्ये राजीव गांधींनी काँग्रेस संदेश यात्रेची घोषणा केली होती. तेव्हा ते पंतप्रधान होते. 400 पेक्षा जास्त जागांवर काँग्रेसचा विजय झाला होता. मुंबई, काश्मीर, कन्याकुमारी, ईशान्येकडील राज्यातून यात्रा झाली. 3 महिने. पण 1989 मध्ये निवडणूकीत पराभव झाला. राजीव गांधींनी पुन्हा 1990 मध्ये भारत यात्रेचा प्रारंभ केला. पण त्यातही यश मिळालं नाही.
कारणं काय?
राजीव गांधींनी सेकंड क्लास एसी बोगीतून प्रवास केला होता. त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत, असं म्हटलं जातं. पक्षांतर्गत कलहदेखील वाढीस लागले होते. राजीव गांधींच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित झाले होते. राष्ट्रीय पातळीवर अपयश आले, मात्र राज्यांतर्गत यात्रेत काही महत्त्वाचे बदल घडले.
आंध्रप्रदेशात यश…
सोनिया गांधींनी वाय एस आर यांना आंध्र प्रदेशाध्यक्ष बनवलं. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस यशस्वी झाली नाही. पण काँग्रेसचा एक बडा चेहरा म्हणून ते ठसवले गेले. वायएसआर यांनी 1600 किमी पदयात्रा केली. 2004 मध्ये सत्तेत आले.
शेतकरी आणि ग्रामीण भागाला जोडलं गेलं. मोफत वीज, कर्जमाफीचे मुद्दे होते. आंध्र प्रदेशात 27 लोकसभेच्या जागा निवडून आल्या होत्या. युपीए सरकारला बळकटी मिळाली होती. पाच वर्ष वायएसआर यांनी यशस्वीपण सरकार चालवलं.
नर्मदा परिक्रमेचं यश
वर्ष होतं 2017. मध्य प्रदेशात दिग्विजय सिंहांनी 230 विधानसभा जागांपैकी 110 ठिकाणी दौरा केला होता. 192 दिवसांची यात्रा. नर्मदेच्या काठावरून 3,300 किमी अंतर समर्थकांसह चालले. त्याचे परिणाम दिसले.
2018 मधील विधानसभा निवडणुकीत 114 जागांवर काँग्रेस आमदार विजयी झाले. भाजपाला 56 जागांवर फटका बसला. त्यानंतर 22 आमदारांनी पक्ष बदलला. सरकार अल्पमतात आले. पण दिग्विजय सिंहांच्या पदयात्रेचं यश दुर्लक्षित करता येणार नाही.
राहुल गांधी आणि चंद्रशेखर यांची यात्रा समान?
माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या यात्रेपासून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेची प्रेरणा घेतीलय, असं म्हटलं जातंय. चंद्रशेखर यांनी कन्याकुमारी ते राजघाटपर्यंत यात्रा काढली होती. वर्ष होतं 1983. त्यावेळी ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. इंदिराजींच्या विरोधात जनमत तयार करण्यात त्यांना यशही मिळाल्याचं म्हटलं जातं.
पण 1984 मध्ये इंदिरा गांधींचा मृत्यू झाला अन् चंद्रशेखर यांच्या यात्रेवर पाणी फिरलं. इंदिराजींच्या मृत्यूमुळे काँग्रेसला 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. आता तोच धागा पकडत राहुल गांधींनी यात्रा सुरु केली आहे.
एकूणच वायएसआर आणि दिग्विजय सिंह यांच्या यात्रा यशस्वी ठरल्या. आता राहुल गांधींची ही यात्रा म्हणजे अग्निपरीक्षाच आहे.
बंडखोरी, नाराजीची साथ काँग्रेसमध्ये सुरु आहे. सर्वात मोठी यात्रा राहुल गांधींनी सुरु केलीय. 3570 किमी अंतर म्हणजे देशातल्या बहुतांश भागातून ते फिरणार. काँग्रेस नेतेही उत्साहात आहेत. त्यामुळे यातून काँग्रेसला संजीवनी निश्चित मिळेल, अशी अपेक्षा केली जातेय.