Congress | काँग्रेस अध्यक्षाचा शोध अजून किती दिवस? राहुल गांधींचा आजही नकार, सोनिया गांधींकडेच पुन्हा जबाबदारी येणार?
भाजपने 2024 मधील पंतप्रधान पदाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केलेली असताना काँग्रेसमधील राष्ट्रीय अध्यक्ष पद कोण घेणार, हाच प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
नवी दिल्लीः देशात एकिकडे भाजपच्या वाढत्या ताकतीपुढे तगडा विरोधी पक्ष हवा, असा सूर उमटत आहे. तर दुसरीकडे एकेकाळचा भाजपचा मजबूत विरोधी पक्ष असलेला काँग्रेसची स्थितीदेखील डळमळीत असल्याचे दिसून येत आहे. पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) असल्या तरीही आता पक्ष नव्या अध्यक्षाच्या शोधात आहे. राहुल गांधी हेच पक्षाचे अध्यक्ष होतील, असे मानले जात होते. मात्र सध्या तरी राहुल गांधी (Rahul Gandhi) काँग्रेसचे अध्यक्ष (Congress President) होण्यासाठी तयार नसल्याची बातमी पुढे आली आहे. आठवडाभरापूर्वीच सोनिया गांधी यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यासंबंधी मत विचारले होते. मात्र एक आठवडाभऱ विचार केल्यानंतरही राहुल गांधी यांनी हा प्रस्ताव नाकारला आहे. या महिन्यात 20 ऑगस्ट रोजी काँग्रेस संघटनेत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होत आहे. यासदरम्यान काँग्रेस निवड समितीचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री हे दिल्लीत येणार आहेत. त्यामुळे या काळात तरी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची दुरा राहुल गांधी सांभाळतील का, याची चर्चा सुरु होती. पण सध्या तरी राहुल गांधींनी तो नाकारल्याचे दिसून येत आहे.
अध्यक्षपदाची निवडणूक होणार
20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरदरम्यान काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहालु गांधी यांनी पद सोडले होते तेव्हा त्यांनी गांधी घराण्याव्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या नेत्याने या पदावर विराजमान व्हावे, असे म्हटले जात होते. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचं नाव अध्यक्षपदासाठी पुढे आलं होतं. पण अनेक नेत्यांनी सोनिया गांधींनाच अंतरिम अध्यक्षपद स्वीकाराण्याचा आग्रह केला होता.
प्रियंका गांधींचा पर्याय?
सोनिया गांधी यांच्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, यावर दिल्लीत चर्चा सुरु आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींनी सध्या या पदासाठी नकार दिलेला असला तरीही त्यांचे मन वळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. एवढे करूनही त्यांनी नकार दिलाच तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव चर्चेत आहे. पण त्यांनाही मुख्यमंत्रीपद सोडायचे नाही, अशी माहिती समोर आली आहे. राहुल गांधींनी त्यांच्या घराण्यातील कोणत्याच व्यक्तीने अध्यक्षपदी विराजमान होऊ नये अशी इच्छा बोलून दाखवली होती, त्यामुळे प्रियंका गांधी यांनीही हे पद सांभाळू नये, असं त्यांना वाटतंय.
अध्यक्षपदावरून प्रश्नचिन्ह कायम..
भाजपने 2024 मधील पंतप्रधान पदाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केलेली असताना काँग्रेसमधील राष्ट्रीय अध्यक्ष पद कोण घेणार, हाच प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सध्या तरी राहुल गांधी अध्यक्ष पदासाठी तयार होतील का? ते नाही झाले तर अशोक गहलोत यांच्या नावावर इतर काँग्रेस नेते सहमती दर्शवतील का? किंवा सोनिया गांधीच अध्यक्ष राहतील, या प्रश्नावर काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरु आहे.