Raj Thackeray Ayodhya : राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित होण्याची दाट शक्यता! आज अधिकृत घोषणा होणार?
Raj Thackeray : 5 जून रोजी होणारा राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित होण्याची शक्यता आहे.
मुंबई : 5 जून रोजी होणारा राज ठाकरे (Raj Thackeray News) यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित होण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी याबाबतची माहिती टीव्ही 9 मराठीला दिली आहे. आज याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी विरोध केलेला होता. राज ठाकरेंनी उत्तर भारतीय जनतेची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली होती. राज ठाकरेंनी याआधी केलेल्या आपल्या भाषणांमधून उत्तर भारतीय जनतेचा अपमान केला असल्याचं आरोप बृजभूषण सिंह यांनी केल्यानंतर राज ठाकरेंचा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) अधिकच चर्चेत आला होता. दरम्यान, आता राज ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळतेय.
पाहा व्हिडीओ :
अयोध्या दौरा का स्थगित ?
राज ठाकरेंचा दौरा जर स्थगित झाला, तर त्याचा उहापोह राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेतून केला जाण्याची शक्यताय. राज ठाकरेंच्यी अयोध्या दौऱ्याच्या तयारीला पुरेसा वेगही आलेला नव्हता. रेल्वेचं आरक्षणही झालेलं नव्हतं. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी 5 जूनला दौरा स्थगित केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्यात 22 तारखेला राज ठाकरेंची सभा होणार आहे. त्या सभेत आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे अधिक स्पष्ट भूमिका मांडण्याचीही शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. अगदी सुरुवातीपासून राज ठाकरेंचा अयोध्या दौरा वादाच्या भोवऱ्यात होता.
एकीकडे विरोध, दुसरीकडे पाठिंबा
दरम्यान, गुरुवारी कांचनगिरी यांनी बृजभूषण सिंह यांना आव्हान दिलं होतं. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना रोखूनच दाखवावं, असं म्हणत राज ठाकरेंची बाजू घेतली होती. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचं तोंडभरुन कौतुकही केलं होतं.
दरम्यान, अमेय खोपकर यांनी राज ठाकरेंच्या सभेसाठीचं पोस्टर ट्वीट करत राज ठाकरेंच्या आगामी सभेची उत्सुकता वाढवली आहे. ‘वादळाला रोखणं सोप्पं असतं व्हयं..’ असं म्हणत राज ठाकरेंच्या सभेचा पोस्टर मनसे नेते अमेय खोपकर यांनी शेअर केलाय.