Raj Thackeray : नितीन गडकरींनी पाठोपाठ रावसाहेब दानवेही राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चा तर युतीचीच होणार
काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर आता रावसाहेब दानवे यांनीही राज ठाकरेंची भेट घतली आहे, भाजप-मनसे युतीची चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली आहे का? अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुंबई : काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेतली. त्यानंतर आता रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) यांनीही राज ठाकरेंची भेट घतली आहे, भाजप-मनसे युतीची चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली आहे का? अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण शिवतीर्थावर राज ठाकरेंनी घेतलीली हिंदुत्वाची भूमिका आणि त्यानंतर भाजप नेत्यांच्या वाढलेल्या गाठीभेटी, त्यामुळे अशा चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहेत. शायना एनसी यांचयासोबत राज ठाकरेंची भेट घेतली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ट्विटरवरून दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्याच्या राजकारणात सध्या मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चेने जोर धरला आहे. मनसेबाबत आता भाजप नेत्यांचा सूरही पूर्वीपेक्षा बदललेला दिसतो आहे. त्यामुळे आगामी काळात युती होण्याची दाट शक्यता आहे.
रावसाहेब दानवे यांचं ट्विट
मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री @RajThackeray यांच्या बरोबर भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली. pic.twitter.com/zvaof4RHck
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) April 9, 2022
काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरींची भेट
गुढी पाडव्याला शिवतीर्थावर राज ठाकरेंची वादळी सभा पार पडली. या सभेत हिंदुत्वाच्या मुद्यावरून राज ठाकरेंनी जोरदार भूमिका घेतली. तसेच मशीदीवरील भोंग्याविरोधत थेट हनुमान चालीसा लावण्याचे आदेशच काढले. त्यानंतर भाजप नेते तेव्हापासून राज ठाकरेंचं चांगलचं कौतुक करत आहेत. त्याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल होत राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळीच मनसे भाजपच्या युतीच्या चर्चाणा उधाण आले होते, मात्र नितीन गडकरी यांनी भेट घेऊन बाहेर आल्यानंतर ही पूर्णपणे वयक्तीक भेट असल्याचे सांगत, यात कुठलीही राजकीय चर्चा नाही, अशी माहिती दिली होती. त्यामुळे या चर्चा लांबणीवर गेल्या होत्या.
हिंदुत्व युतीची गाठ बांधणार?
मात्र आज पुन्हा रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने पुन्हा या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसातच राज्यात अनेक मोठ्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागत आहेत. त्यात मुंबई महापालिकेचाही समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनसे भाजप युतीचे समीकरण हिंदुत्वाचा मुद्दा जुळवतो का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. येत्या काही दिवसातच याबाबत चित्र स्पष्ट होईल.