Raj Thackeray Uttar Sabha : राज ठाकरेंचा पवार, राऊतांवर हल्लाबोल; आता राऊतांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचं जोरदार प्रत्युत्तर
राज ठाकरे यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राज ठाकरे यांच्या उत्तर सभेतील टीकेला आता संजय राऊत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंग्यांना तीव्र विरोध दर्शवला होता. राज यांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठीच राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात उत्तरसभेचं आयोजन केलं. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राज ठाकरे यांच्या उत्तर सभेतील टीकेला आता संजय राऊत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय.
दिवा विझताना मोठा होतो- राऊत
राज ठाकरे यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका करताना त्यांचा ‘लवंडे’ असा उल्लेख केला. ‘नुसत्या फक्त प्रॉपर्टी अटॅच केल्या तर शिव्या द्यायला लागले पत्रकार परिषदेत. काय पण भाषा पत्रकार परिषदेतील…एक संपादक येतो काय म्हणतो तर *** ****… हे कुठचे आहेत तेच कळत नाही, हे शिवसेनेचे आहेत का राष्ट्रवादीचे आहेत. यांच्यासाठी आमच्या आजोबांनी एक छान शब्द काढला होता असल्या वृत्तीच्या लोकांसाठी… हे सगळे लवंडे. व वरती अनुस्वार आहे लक्षात ठेवा. पत्रावळी असते आणि द्रोण असतो. द्रोणात आमटी जिकडे पडेल तिकडे तो लवंडतो म्हणून हे लवंडे. इकडे पडली की शिवसेनेकडे लवंडे, तिकडे पडली की राष्ट्रवादीकडे लवंडे, हे असे लवंडे’, असं म्हणत राज यांनी राऊतांवर शेलक्या शब्दात निशाणा साधला. तर राज यांच्या या टीकेनंतर संजय राऊत यांनी ट्वीट केलंय. ‘दिवा विझताना मोठा होतो! हे आज पुन्हा दिसले! जय महाराष्ट्र!!’ असं संजय राऊत म्हणाले.
दिवा विझताना मोठा होतो! हे आज पुन्हा दिसले! जय महाराष्ट्र!!
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 12, 2022
वारसा प्रबोधनकारांचा मात्र विचारसरणी गोडसेची – पाटील
जयंत पाटील यांनीही राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय. वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची अशा शब्दात जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 2014 ला मोदींना पाठिंबा… 1019 ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर. पुतण्या माननीय बाळासाहेब ठाकरेंचा… मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी… वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत’, अशी टीका जयंत पाटील यांनी केलीय.
२०१४ला मोदींना पाठींबा, २०१९ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर,
वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची,
पुतण्या मा. बाळासाहेब ठाकरेंचा,मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी.
वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 12, 2022
त्यांनी कधी बहुजनांचा इतिहास वाचलाच नाही- आव्हाड
तर जितेंद्र आव्हाड यांनीही राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलंय. स्टँड अप कॉमेडियनच्या जागा रिकाम्या आहेत, त्या जागा त्यांनी घ्याव्यात. माझा चेहरा नागाच्या फणाराखा आहे, त्याचा मला अभिमान आहे. मात्र, तुमचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा आहे हे आरशात तपासून पाहा, असा टोला आव्हाड यांनी राज ठाकरेंना लगावलाय. तसंच शाहू, फुले, आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचेच वारसदार आहेत. त्यांनी कधी बहुजनांचा इतिहास वाचलाच नाही. नेहमी पुरंदरे यांचाच इतिहास वाचत गेले. ज्या पुरंदरेंनी जेम्स लेनला माहिती देऊन आमच्या जिजाऊंची बदनामी केली’, अशा शब्दात आव्हाड यांनी राज ठाकरे यांना उत्तर दिलंय.
पण देशाच्या चित्रपट सृष्टीला जे जॉनी लिवर देऊ शकला ते कोणीच नंतर देऊ शकलं नाही.
आज महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर एक नवीन जॉनी लिवर जन्माला आला आहे. या नवीन जॉनी लिवरला खूप खूप शुभेच्छा!
जश्यास तसे हि संत तुकारामाची शिकवण …
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 12, 2022