राज ठाकरे यांचं पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना पत्रं; म्हणाले, तुमचे शतश: आभार
एका गटाचा आग्रह निवडणूक लढण्याचा होता. तर दुसऱ्या गटाचं मत निवडणूक न लढण्याचं होतं. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार हे निवडणूक लढण्याच्या मताचे होते.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी भाजपला (bjp) अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक न लढविण्याचं आवाहन केलं होतं. भाजपने या आवाहनाला प्रतिसाद देतानाच मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या उमेदवार ऋुतजा लटके (rutuja latke) यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या या माघारीनंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं असून त्यांनी फडणवीस आणि भाजपचे आभार मानले आहेत.
राज ठाकरे यांनी चारओळीचं पत्रं लिहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व)च्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार, असंही राज यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी काल फडणवीस यांना पत्रं लिहून भाजपचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भाजपला राजकीय संस्कृतीचा सल्ला देताना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. दोन्ही नेत्यांच्या या आवाहनानंतर भाजपच्या गोटात अचानक हालचाली सुरू झाल्या.
काल रात्री भाजपची बैठक पार पडली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही फडणवीस यांनी चर्चा केली. त्यानंतर आज सकाळी पुन्हा भाजपची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपमध्ये दोन मतप्रवाह दिसून आले.
एका गटाचा आग्रह निवडणूक लढण्याचा होता. तर दुसऱ्या गटाचं मत निवडणूक न लढण्याचं होतं. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार हे निवडणूक लढण्याच्या मताचे होते. मात्र, तरीही पक्षाने ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला.
भाजपच्या या निर्णयानंतर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं जाहीर केलं. आपल्यावर कोणताही दबाव नाही. आपण निराश नाही. पक्षाचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असं सांगतानाच ऋतुजा लटके यांना आपल्या शुभेच्छा आहेत, असं मुरजी पटेल म्हणाले.