Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : ज्या दोन राज्यात निवडणूक लांबली, तिथेच भाजप विजयी?; वाचा नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : महाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणूक होणार होती. पण भाजपने सातवा उमेदवार दिल्याने ही निवडणूक रंगतदार झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे एकूण 172 मतांचं संख्याबळ होतं.
मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपला मोठा विजय मिळाला आहे. राज्यातील भाजपचे (bjp) तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचा उमेदवारही विजयी झाला आहे. जे महाराष्ट्रात घडलं तेच हरियाणातही घडलं आहे. तिथेही काँग्रेसच्या अजय माकन (ajay makan) यांचा पराभव करण्यात भाजपला यश आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणूक प्रक्रियेवर भाजपने आक्षेप घेतला होता. भाजपने ज्या राज्यात आक्षेप घेतला त्याच राज्यात त्यांचा दणदणीत विजय झाला. अगदी संख्याबळ नसतानाही भाजपला अनपेक्षित विजय मिळाला. परफेक्ट गोळाबेरीज करत भाजपने किल्ला सर केला. महाराष्ट्रात तर आघाडीकडे संख्याबळ असूनही शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. तेच हरियाणात घडलं. हरियाणात काँग्रेसचे दिग्गज नेते अजय माकन यांचा पराभव झाला. काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
महाराष्ट्रात काय घडलं?
महाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणूक होणार होती. पण भाजपने सातवा उमेदवार दिल्याने ही निवडणूक रंगतदार झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे एकूण 172 मतांचं संख्याबळ होतं. त्यामुळे आकडेवारीवरून तरी आघाडी सहज विजयी होईल असं दिसत होतं. तर भाजपचा उमेदवार पडणारच असं चित्रं होतं. मात्र, प्रत्यक्षात निवडणूक निकाल हाती येताच आघाडीला धक्का बसला. भाजपचा उमेदवार विजय झाला. त्यामुळे शिवसेनेच्या तंबूत प्रचंड खळबळ उडाली आहे.
राज्यात म्हणून मतमोजणी लांबणी
महाराष्ट्रात तब्बल सात ते आठ तास मतमोजणी लांबली. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांनी निवडणूक नियमांचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला. आव्हाड यांनी जयंत पाटील यांना, ठाकूर यांनी नाना पटोले यांना आपली मतपत्रिका दाखवल्याचा आरोप ठेवण्यात आला. तर कांदे यांनी दोन्ही पोलिंग एजंटला मत दाखवल्याचा आरोप झाला. त्याला भाजपने आक्षेप घेतला. तर रवी राणा यांनी खिशात हनुमान चालिसाचं पुस्तक ठेवून हिंदू मतांना प्रभावित केलं. तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका आशिष शेलारांना दिल्याची तक्रार काँग्रेसने केली होती. भाजप आणि काँग्रेसने या प्रकरणी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यामुळे आयोगाने व्हिडिओ फुटेज मागवून त्याची पाहणी केली. त्यामुळे मतमोजणी सात तास लांबली. मध्यरात्री 3 वाजता या निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजपचा उमेदवार विजयी झाला.
अजय माकन यांचा पराभव
हरियाणात काँग्रसेचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांचा पराभव करण्यात भाजपला यश आलं. राजस्थानात नियमांचं उल्लंघन झाल्याने मतमोजणीत अनेक तासांचा विलंब झाला. भाजपने नियम भंग झाल्याने आक्षेप घेतला होता. त्यानंतर भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. अपक्ष उमेदवार कार्तिकेय यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करून दोन काँग्रेस आमदारांचं मत बाद करण्याची मागणी केली. त्यावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी झाली. या सुनावणीला सात तास लागले. सर्व शहानिशा केल्यानंतर निवडणूक आयोगाने कार्तिकेय यांचा आरोप फेटाळून लावला. त्यानंतर मध्यरात्री मतमोजणीस सुरूवात झाली आणि मध्यरात्री निकाल लागला.