Uddhav Thackeray : ‘कितीही प्रयत्न करा मविआचे चारही उमेदवार राज्यसभेत जाणार’, मुख्यमंत्र्यांचा दावा; बैठकीतील इनसाईड स्टोरी वाचा सविस्तर
आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मार्गदर्शन केलं. सुमारे 50 मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा दावा केलाय. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेत जाणार, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.
मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) तोंडावर राज्यात पुन्हा एकदा जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. अशावेळी घोडेबाजार होण्याची भीती व्यक्त केली जातेय. त्यामुळे शिवसेनेने आपल्या आमदारांना हॉटेल मुक्कामी पाठवलं. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंही आपल्या आमदारांची व्यवस्था हॉटेलमध्ये केलीय. आज हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) शक्तीप्रदर्शन केलं. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी 12 अपक्ष आमदारही उपस्थित होते. या आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मार्गदर्शन केलं. सुमारे 50 मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा दावा केलाय. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेत जाणार, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.
‘मविआचे चारही आमदार राज्यसभेवर जाणारच’
इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणारच असा दावा केलाय. पत्रकारांनी आमदारांना काय संबोधन केलं असा प्रश्न विचारला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं. असं संबोधन सांगण्यासारखं असतं तर तुम्हाला आतमध्ये बोलावलं असतं. त्याचवेळी कोणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारीचे चारी उमेदवार राज्यसभेत निवडून जाणारच, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.
सभ्यता पाळायला हरकत नव्हती, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भाजपला जोरदार टोला हाणलाय. एक परंपरा आपण पाळत आलो आहोत. सभ्यता आणि राजकारण या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी असल्या तरी राजकारणात थोडीफार सभ्यता असायला हरकत नाही. 22-23 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे. शेवटची राज्यसभेची निवडणूक कधी झाली होती हे आठवावं लागतं. त्यामुळे सभ्यता पाळायाला हरकत नव्हती, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत.
बैठकीत तांत्रिक बाबी सांगितल्या गेल्या नाहीत?
महत्वाची बाब म्हणजे आजची बैठक ही आमदारांना मतदाना संदर्भात तांत्रिक मुद्दे समजावून सांगण्यात येतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली होती. मात्र, आजच्या बैठकीत कुठल्याही तांत्रिक बाबी सांगितल्या गेल्या नाहीत, असं आमदारांनी बैठकीनंतर सांगितलं.
अजून काही बैठका होणार- चव्हाण
आमच्याकडे चांगलं संख्याबल आहे. संख्याबळ नसताना भाजपने उमेदवार उभे केले. त्यामुळे घोडेबाजार करण्याचा भाजपचा उद्देश स्पष्ट आहे, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसंच आमदारांच्या अजून काही बैठका पार पडतील आणि त्यांना सर्व रुपरेषा व्यवस्थित समजावून सांगितली जाईल, असं चव्हाण यांनी सांगितलं.
12 अपक्ष आमदार उपस्थित
शिवसेनेचा दुसरा तर भाजपचा तिसरा उमेदवार राज्यसभेत पाठवायचा असेल तर त्यांची मदार अपक्ष आमदारांवर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप नेते अपक्ष आमदारांची मनधरणी करताना दिसून येत आहेत. अशावेळी महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीला कोणकोणते अपक्ष आमदार उपस्थित राहणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, महाविकास आघाडीच्या जिवात जिव आल्याचं आज पाहायला मिळालं. कारण आजच्या बैठकीला 12 अपक्ष आमदारांनी हजेरी लावली होती.
कोणते अपक्ष आमदार उपस्थित?
- गीता जैन
- देवेंद्र भुयार
- मंजुळा गावित
- आशिष जयस्वाल
- किशोर जोरगेवार
- नरेंद्र भोंडकर
- श्यामसुंदर शिंदे
- संजय मामा शिंदे
- चंद्रकांत पाटील (जळगाव)
- विनोद निकोले
- विनोद अग्रवाल
- राजकुमार पटेल