महात्मा फुले, अण्णा भाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या; रामदास आठवले भेटले अमित शहांना

| Updated on: Dec 01, 2021 | 5:17 PM

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

महात्मा फुले, अण्णा भाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या; रामदास आठवले भेटले अमित शहांना
ramdas athawale
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत आठवले यांनी शहा यांच्याकडे महात्मा फुले आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे. तसेच या दोन्ही नेत्यांमध्ये उत्तर प्रदेशात भाजप-रिपाइं युती करण्यावरही चर्चा करण्यात आली.

रामदास आठवले यांनी आज अमित शहा यांची संसदेत भेट घेतली. यावेळी त्यांनी शहा यांच्याकडे ही मागणी केली. महात्मा ज्योतिबा फुले हे स्त्रीशिक्षणाचे प्रणेते आहेत. त्यांनी स्त्रीशिक्षण, दलितांचे शिक्षण, दलित आणि स्त्रियांचे मानवी हक्क, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेले काम युगप्रवर्तक आहे. भारत राष्ट्र म्हणून महापुरुषांच्या विचारांमुळे मजबुतीने प्रगती करीत आहे. महत्मा फुलेंचे कार्य अजोड आणि सदैव प्रेरणादायी आहे. महात्मा फुले यांच्या युगप्रवर्तक कार्याचा भारतरत्न ‘किताब देऊन गौरव करण्यात यावा याबाबतचे पत्र आज आठवले यांनी शहा यांना दिले आहे.

अण्णा भाऊंचं साहित्य प्रेरणादायी

तसेच साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रात आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत अभूतपूर्व योगदान आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जागतिक स्तरावर गाजलेले आहे. त्यांचे साहित्य अखिल मानवजातीला प्रेरणादायी आहे. त्यामुळे अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा भारतरत्न या किताबाने गौरव झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी या पत्रातून केली आहे.

आठवलेंचा युतीचा प्रस्ताव

यावेळी त्यांनी शहा यांच्याशी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवरही चर्चा केली. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने आरपीआय सोबत युती करून काही जागा सोडाव्यात. भाजप-आरपीआय युती झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपला आरपीआयमुळे मोठे यश मिळविता येईल, असं त्यांनी शहांना सांगितलं. त्यावर, शहा यांनी या वर विचार करू असे आश्वासन दिल्याचं आठवले म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

एसटी कर्मचाऱ्यांच्या 3 टक्के वेतनवाढीचे परिपत्रक काढले; 10 वर्षे सेवा झालेल्यांचा पगार 5 हजारांनी वाढणार

हम महाराष्ट्र में नही आ रहे है; ममता बॅनर्जींचा नेमका प्लान काय?

ममतांसोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? पवारांनी जे सांगितलं त्यानं काँग्रेसची चिंता वाढणार?