राहुल गांधी यांच्या ‘त्या’ विधानाला विरोध, सावरकरांचे नातू रणजीत सावरकर पोलिसात तक्रार करणार
राहुल गांधींच्या विधानावर आक्षेप, रणजीत सावरकर हे पोलिसात तक्रार देणार...
मुंबई : काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या सुरु आहे. यात बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विनायक सावरकर यांच्याविषयी विधान केलं. त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर (Ranjeet Savarkar) हे पोलिसात तक्रार देणार आहेत.
रणजीत सावरकर तक्रार करणार
राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानावर आक्षेप घेण्यात आला आहे.सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर पोलिसात तक्रार करणार आहेत. मुंबईतील दादर पोलीस स्टेशनमध्ये रणजीत सावरकर तक्रार दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिंदेगटाचे खासदार राहुल शेवाळेदेखील उपस्थित असणार आहेत.
राहुल गांधी यांचं विधान काय?
भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर टीका केली. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे.तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय.
राहुल गांधीच्या विधानावर फडणवीसांची टीका
सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमीनीमध्ये गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, असं फडणवीस म्हणालेत. हिंगोलीत राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान करणारं विधान केलं आणि आदित्य ठाकरे राहुल गांधींसोबत पदयात्रा करतात. हे पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.