भाजपात येण्यासाठी रामराजे निंबाळकर रोज मंत्र्यांचे उंबरठे झिजवतात : रणजित नाईक निंबाळकर
राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) हे भाजपमध्ये (BJP) येण्यासाठी रोज मंत्र्यांचे उंबरठे झिजवत असल्याचं म्हणत भाजपचे खासदार रणजित नाईक निंबाळकर (Ranjit Naik Nimbalkar) यांनी रामराजेंची खिल्ली उडवली आहे.
सोलापूर : राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) हे भाजपमध्ये (BJP) येण्यासाठी रोज मंत्र्यांचे उंबरठे झिजवत असल्याचं म्हणत भाजपचे खासदार रणजित नाईक निंबाळकर (Ranjit Naik Nimbalkar) यांनी रामराजेंची खिल्ली उडवली आहे. रामराजेंनी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला (Shivswarajya Yatra) दांडी मारली. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार का या प्रश्नावर रणजित निंबाळकर बोलत होते.
रणजित नाईक निंबाळकर म्हणाले, “राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर हे भाजपमध्ये येण्यासाठी रोज मंत्र्यांचे उंबरठे झिजवत असल्याचं मी ऐकलं आहे. मी नीरा देवभर धरणाचे (Neera Devdhar Water) पाणी वळवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवारांचंही काही चालत नाही हे अनेकांच्या लक्षात आल्यानं अनेकजण भाजपमध्ये येत आहेत.”
‘खासदार उदयराजे भोसलेंनी लवकर भाजपमध्ये यावं’
रणजित निंबाळकरांनी साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले (Udayraje Bhosale) यांच्या भाजप प्रवेशावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “खासदार उदयनराजे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी लवकरच भाजपमध्ये यावं, अशी माझी इच्छा आहे.”
‘माढातून भाजपनं दगडाला उभं केलं तरी निवडून आणणार’
माढा मतदारसंघातून पक्षानं (भाजप) दगडाला उमेदवारी दिली, तर मी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मत रणजित निबाळकरांनी व्यक्त केलं. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. ते भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरले तर त्यांना मदत करणार का या प्रश्नाला उत्तर देताना रणजित नाईक निंबाळकर बोलत होते.