आधी रिफायनरीसाठी पत्र लिहिलं आणि आता विरोध, हा नेमका विचार कसा बदलला?; नितेश राणे यांचा ठाकरेंना सवाल
Nitesh Rane on Uddhav Thackeray : रिफायनरी प्रकल्प, उद्धव ठाकरे यांचं पत्र अन् दलालीची भाषा; नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
बारसू : रत्नागिरीतील बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प होऊ घातला आहे. या प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी आंदोलन करत आहेत. या आंदोलकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूमध्ये जात आहेत. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे. आधी रिफायनरीसाठी पत्र लिहिलं आणि आता विरोध, हा नेमका विचार कसा बदलला?, असा थेट सवाल नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
राजापूरमधल्या जवाहर चौकात रिफायनरी समर्थक एकत्र जमले आहेत. तिथं ते प्रकल्पाच्या बाजूने घोषणाबाजी करण्यात आली. निलेश राणे, नितेश राणे, प्रमोद जठार हे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला जाणार आहे. सिंधुदुर्गातून राणे समर्थक मोठया संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तिथं बोलताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
नितेश राणे यांनी बारसूतील रिफायनरी प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पत्र लिहून बारसूत रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणून पत्र काढलं आणि आता विरोध करता आहेत. हा नेमका विचार कसा बदलला? हा विचार कोकणच्या विकासासाठी नाही बदलला तर मातोश्रीवर पैसे आले पाहिजेत. म्हणून बदलला आहे”, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातला सर्वात मोठा दलाल बारसूत आलेला आहे. असे दलाल कोकणात यायला द्यायचे का? याचा कोकण वासीयांनी विचार करायला हवा, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.
एक पर्यटक मुंबईवरून इथे आलेला आहे.बारसू गावात जाऊन पेटवापेटवी करत आहेत, असा टोला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
उद्धव ठाकरे मन की बात समजतात की धन की बात समजतात हे त्यांनी सांगावं. सगळा पैसा आदित्य आणि तेजस ठाकरेंनी कमवायचा आहे का? कोकणातल्या तरुणांनी पैसे नाही कमवायचे का? असा सवाल मला उद्धव ठाकरेंना विचारायचा आहे, असंही राणें म्हणाले.
आज आपण गप्प बसलो ,आज विरोध केला नाही तर आपण आपल्या मुलांना काय उत्तर देणार. तुम्हाला अपेक्षित असणारा विकास या रिफायनरीच्या माध्यमातून होणार आहे. हा मोर्चा ही एक फक्त झलक होती. जोपर्यंत आपण आपली ताकद दाखवत नाहीत. तोपर्यंत राज्यसरकारकडे संदेश जाणार नाही. कोणावरही दडपशाही न करता प्रकल्प पुढे न्याययचा आहे ही सरकारची आणि भाजपची भूमिका आहे, असंही नितेश राणे यावेळी म्हणाले.