Parag Manere : निलंबित पोलीस अधिकारी पराग मणेरेंची पुन्हा नियुक्ती; शिंदे, भाजपा सरकारचा मोठा निर्णय
परमबीर सिंग यांच्याशी संबंधित कथित खंडणी प्रकरणात महाविकास आघाडी सरकारने डीसीपी पराग मणेरे (Parag Manere) यांना निलंबित केले होते. पूर्वीचा निर्णय रद्द करत शिंदे, भाजप सरकारने पराग मणेरे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : सत्तेत येताच शिंदे आणि भाजप (BJP) सरकारने पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारला धक्क्यावर धक्के देणे सुरूच ठेवले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्थगिती दिली आहे. त्यामध्ये विविध विकास कामांना देण्यात आलेल्या निधीचा निर्णय तसेच औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाला देण्यात आलेली स्थगिती यांचा समावेश होतो. मात्र त्यानंतर शिंदे, भाजपा सरकारने औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आता शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारला आणखी एक धक्का दिला आहे, तो म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधित कथित खंडणी प्रकरणात महाविकास आघाडी सरकारने डीसीपी पराग मणेरे (Parag Manere) यांना निलंबित केले होते. पूर्वीचा निर्णय रद्द करत शिंदे, भाजप सरकारने पराग मणेरे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चर्चेला उधान आल्याचे पहायला मिळत आहे.
पराग मणेरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप
परमबीर सिंग यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात महाविकास आघाडी सरकारने सेवेतून निलंबित केले होते. याच प्रकरणात डीसीपी पराग मणेरे यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आणि खंडणीचे आरोप झाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारने मणेरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना सेवेतून निलंबित केले होते. मात्र आता नवीन सरकार सत्तेत येताच पराग मणेरे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता यावर विरोधकांच्या काय प्रतिक्रिया असतील ते पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Maharashtra | DCP Parag Manere who was suspended by the Uddhav Thackeray Govt in alleged extortion case related to Param Bir Singh has been reinstated by the Eknath Shinde Govt.
— ANI (@ANI) August 4, 2022
नेमकं प्रकरण काय?
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात परमबीर सिंग यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतला होता. याच प्रकरणात डीसीपी पराग मणेरे यांच्यावर देखील शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा पराग मणेरे यांना सेवेत घेण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे.