…. वरून आदेश आल्यानंतर अजित पवारांविरोधात आंदोलन, रोहित पवारांचा रोख कुठे?
अजित पवारांविरोधात आंदोलन करण्यासाठी वरून आदेश आला होता, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
योगेश बोरसे, पुणेः महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात भाजप (BJP) गप्प आहे. पण अजित पवार यांच्याविरोधात उगाचच राजकारण केलं जातंय. वरून आदेश आल्यामुळेच अजित पवारांविरोधात (Ajit Pawar) आंदोलन केलं गेलं, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. अजित पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षक होते, असे वक्तव्य केले. यावरून भाजपने त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन केलं. अजित पवारांनी माफी मागण्याची मागणी भाजपने केली आहे.
हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं. त्यानंतर या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटायला सुरुवात झाली. बुधवारी अखेर अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. मी बोलले ते योग्यच आहे. माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. मात्र माझ्याविरोधात केलेलं आंदोलन हे एका भाजपच्याच मास्टरमाइंडचं षडयंत्र आहे, असं वक्तव्य अजित पवारांनी काल पत्रकार परिषदेत केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले, ‘ पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव अण्णा यांच्याबद्दल भाजपच्या लोकांनी , राज्यपालांनी जे लोक गप्प बसले होते. मात्र अजित पवारांच्या वक्तव्यानंतर त्यांना संधी मिळाली आणि त्याचं राजकारण केलं. आंदोलन करण्यासाठी वरून आदेश आला होता, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
नितेश राणे यांनी अजित पवारांवर धरणवीर म्हणत टीका केली. त्यावर रोहित पवारांनी प्रत्युत्तर देणं टाळलं. ते म्हणाले, ‘ ही न संपणारी गोष्ट आहे. आपण वैचारिक उंची पाळून बोलतो. काही लोक ती उंची न गाठता वक्तव्य करतात. जेवढं कमी बोलू, तेवढं हिताचं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबजी असा उल्लेख केला, त्यावर रोहित पवार म्हणाले, ‘ बावनकुळे यांनी औरंगजेबाला जो आदर दिला, त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण द्यावं, आणि त्यानंतर अजित पवारांवर बोलावं.