‘ते आज असते माझ्यासोबत तर….’ उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी ऋतुजा लटके EXCLUSIVE
ठाकरे गटाकडून दिवगंत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी! आज दाखल करणार आपला उमेदवारी अर्ज
अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) या निवडणूक आयोगाने दिलेल्या पक्ष नावाखाली ऋतुजा लटके आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांनी टीव्ही 9 मराठीसोबत एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. आज जर रमेश लटके साहेब सोबत असते, तर मला जास्त आनंद झाला, असं म्हणत ऋतुजा लटके यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Andheri East By Election) पार्श्वभूमीवर सध्या राजकारण तापलंय.
बीएमसी हेडऑफिसला जाण्याआधी ऋतुजा लटके यांनी गणेश मंदिरात दर्शन घेतलं. त्यावेळी त्या बोलत होत्या. ऋतुजा लटके यांनी सांगितलं की,
आज दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण गणपतीच्या पुजेनं करतो. आजच्या दिवसाची सुरुवातही मी त्याप्रमाणे बाप्पाचं दर्शन घेऊन केली आहे. यानंतर मी बीएमसी हेडऑफिसला जाऊन राजीनामा स्वीकारणार आहे.
हे सुद्धा वाचा
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याआधी ऋतुजा लटके यांच्याकडून शक्तिप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी लटके यांच्या कार्यकर्त्यांनी नियोजनही केल्याचं त्या म्हणाल्या.
ज्याप्रमाणे रमेश लटके हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मालपाडोंगरी येथे जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचे, त्याचप्रमाणे मी देखील तिथे जाणार आहे. मालपाडोंगरी येथील गणेश मंदिरात दर्शन घेतल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं ऋतुजा लटके यांनी यावेळी सांगितलं.
ठाकरेंशिवाय पर्याय नाही!
रेकॉर्डब्रेक विजय खेचून आणायचा आहे, असं आवाहन ऋतुजा लटके यांनी मतदारांना केलं. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा हवा असल्याचंही त्या म्हणाल्या. शिवाय महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही, असंही त्यांनी म्हटलं.
बीएमसीमध्ये लिपिक म्हणून नोकरीवर असणाऱ्या ऋतुजा लटके यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. मात्र हा राजीनामा बीएमसीकडून मान्य करण्यात आला नव्हता. याविरोधात अखेर हायकोर्टात ठाकरे गटाला दाद मागावी लागली होती.
गुरुवारी मुंबई हायकोर्टानं लटके यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यामुळे मोठा दिलासा ठाकरे गटासह ऋतुजा लटके यांना मिळाला. आता ऋतुजा लटके यांच्याविरोधात भाजपचे मुरजी पटेल अशी लढत अंधेरी पोटनिवडणुकीत होणार आहे.
3 नोव्हेंबर रोजी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 6 नोव्हेंबरला या निवडणुकीला निकाल जाहीर होणार आहे. ठाकरे गटाची प्रतिष्ठा या पोटनिवडणुकीत पणाला लागली आहे.