“बाळासाहेब स्वाभिमानाचा हिमालय, ढोंग मान्यच नाही! पण शिंदे गट…”, सामनाचा विशेष अग्रलेख
बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10 वा स्मृतीदिन. सामनाच्या अग्रलेखातून त्यांना अभिवादन करण्यात आलंय...
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10 वा स्मृतीदिन (Balasaheb Thackeray Death Anniversary) आहे. सामनाच्या आजच्या अग्रलेखातून त्यांना अभिवादन करण्यात आलं आहे. याचवेळी शिंदेगटावर घणाघाती टीका करण्यात आली आहे. “बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचाराने महाराष्ट्र आणि देश आजही भारावलेला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा फुटीर गट बेइमानी करूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जप करतोय, हे ढोंग आहे”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.
बाळासाहेबांच्या जीवनात व आचरणात ढोंगाला अजिबात स्थान नव्हते. बाळासाहेब सगळ्यांचे होते; पण त्यांनी बेइमानीस कधीच थारा दिला नाही. लाखो निष्ठावान शिवसैनिक आज बाळासाहेबांचा जयजयकार करतील. त्यांच्या विचारांच्या पेटत्या मशालीसमोर नतमस्तक होतील. बाळासाहेब हे महाराष्ट्रात जन्मलेले स्वाभिमानाचे हिमालय होते. त्या हिमालयाच्या शिखरावर फक्त भगवाच आहे! जगाच्या इतिहासातील अमर महापुरुषांच्या श्रेणीत बाळासाहेबांचे स्थान अढळ आहे. त्यांचे योद्धेपण इतिहासात अधिक तेजाने तळपत राहील, असं म्हणत आजच्या सामनातून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यात आलं आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन. संकटांचे पहाड कोसळले तरी त्या संकटांच्या छाताडावर पाय रोवून उभे राहणारे त्यांचे नेतृत्व. अनेक वाद, वादळे आणि वावटळी त्यांनी अंगावर घेतल्या व परतवून लावल्या. मनुष्याचे अंतरंग स्पष्टपणे व्यक्त होण्याची वेळ आणि त्याच्या खऱया कसोटीचा प्रसंग म्हणजे संकट. त्या वेळी तेजस्वी पुरुष हताश होऊन स्वस्थ बसत नाहीत. शिवसेनाप्रमुखांच्या बाबतीतही तेच घडले, असं म्हणत सामनातून बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वाच्या उजव्या बाजू सांगितल्या आहेत.
इंग्रजांनी आमच्या देशाची लूट केली तशीच लूट मुंबईसह महाराष्ट्राची सुरू होती. त्या वेळी बाळासाहेबांच्या विचारांची वीज कडाडली व संपूर्ण महाराष्ट्र त्या विचाराने उजळून निघाला. तो प्रकाश, ते तेज आजही कायम आहे. बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न आजपर्यंत काय कमी झाले? मात्र त्या सगळ्यांना शिवसेना पुरून उरली. आता शिवसेनेचा सूर्य गिळण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण या सूर्याच्या प्रखर तेजाने दुश्मन जळून खाक होईल, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.