अहो, आगलावे बोम्मई, मिटवायचे की पेटवायचे?; ‘सामना’तून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना खरमरीत सवाल
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर भाष्य करण्यात आलंय...
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगलीतील जतमधल्या गावांवर हक्क सांगितल्यापासून हा प्रश्न पुन्हा एकदा पेटलाय. अशात आजच्या सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर भाष्य करण्यात आलं आहे. तसंच बसवराज बोम्मई यांनाही परखड सवाल करण्यात आला आहे.
कर्नाटकची एक इंचही जमीन देणार नाही, असे बोम्मई यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रालाही कर्नाटकची इंचभरही जमीन नकोच आहे. महाराष्ट्राला त्यांच्या हक्काचा बेळगावसह सीमा भाग हवा आहे व त्यासाठी लोकशाही तसेच कायदेशीर मार्गाने लढा सुरू आहे . महाराष्ट्राने संयम राखला आहे व तीच महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आहे .
महाराष्ट्राच्या विधानसभेत थातूरमातूर विषयांवर खोके सरकार नंगानाच करीत आहे आणि तिकडे कर्नाटक सरकारने महाराष्ट्राविरोधात निषेधाचाच ठराव मंजूर करून चपराक लावली आहे . हे समजत नसेल तर निर्लज्जपणाची हद्दच झाली! बोम्मई यांनी एक सांगावे , त्यांना हा वाद मिटवायचा आहे की पेटवायचा आहे ? त्यावर महाराष्ट्र आपली भूमिका ठरवेल!, असं म्हणत सामनातून संजय राऊत यांनी बोम्मईंना इशारा दिलाय.
चीन जगभरात ज्या पद्धतीने सर्वत्र घुसखोरी करीत आहे त्याच पद्धतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई बेळगाव गिळू पाहत आहेत. सांगली, सोलापुरात घुसण्याची भाषा करीत आहेत. त्यांच्या घुसखोरीस त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल, पण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांत ‘ठोक’ उत्तर देण्याची हिंमत नसल्याने जनतेला ‘मऱहाठी’ बाणा दाखवावा लागत आहे, असं म्हणत सामनातून शिंदे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.