“शिंदेंना बळ मिळो!”, सामना अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांसाठी शुभचिंतन
Cm Eknath Shinde : सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी शुभचिंतन
मुंबई : संजय राऊतांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक झाल्यानंतर सामनाच्या संपादकपदाची धुरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या खांद्यावर घेतली. कालच त्यांनी ही जबाबदारी स्विकारली. त्यानंतर आज पहिला अग्रलेख (Saamana Editorial) प्रसिद्ध झाला आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठी शुभचिंतन व्यक्त करण्यात आलंय. सध्या एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ठीक व्हावी आणि त्यांना बळ मिळो! अश्या शीर्षकाखाली आजचा आजचा अग्रलेख प्रसिद्ध झालाय. “शिंद्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चाळीस समर्थकांसाठी हा शुभशकुन नाही. औटघटकेच्या सरकारसाठी ‘स्ट्रेचर’ व अॅम्ब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरे व्हावे, त्यांना बरेच काही पाहायचे आहे. ईश्वर त्यांना ते सर्व पाहण्याचे बळ देवो!”, असं सामनात म्हणण्यात आलंय. शिवाय सर्वोच्च न्यायालयीन सुनावणीचा दाखला देत ‘धनुष्य बाण’ आमच्याकडेच राहणार, असा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय.
“महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला आता जवळ आला आहे. या प्रकरणात काय घडले की, आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो! अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे. त्यांना आता मळमळत आहे. गरगरत आहे. क्रांतीच्या वल्गना केल्या व आता भीतीपोटी वांती सुरू झाली. शिंद्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चाळीस समर्थकांसाठी हा शुभशकुन नाही. औटघटकेच्या सरकारसाठी ‘स्ट्रेचर’ व अॅम्ब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरे व्हावे, त्यांना बरेच काही पाहायचे आहे. ईश्वर त्यांना ते सर्व पाहण्याचे बळ देवो!”, असं सामनात म्हणण्यात आलंय.
‘धनुष्य बाण’ आमचाच
शिवसेनेचे ‘धनुष्य बाण’ चिन्ह आम्हालाच मिळेल व आमचीच सेना खरी या त्यांच्या दाव्यातील पोकळपणाही उघड झाला आहे. शिवसेनेच्या धनुष्य बाणावर सध्या कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले. त्यातूनही अनेकांना नवे आजार जडू शकतात. एक गोष्ट मान्य केली पाहिजे, शिवसेनेची बाजू सत्याची आहे व 56 वर्षांच्या आयुष्यात शिवसेनेने विश्वासघाताचे असे हलाहल अनेकदा पचवले आहे. त्यामुळे घाव घालणाऱ्यांच्याच तलवारी तुटल्या, , असे इतिहास सांगतो. शिंदे व त्यांच्या गटास हे आता उमजू लागले आहे. आपण फार मोठी क्रांती केली हा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. आता सोबतीला खोकी उचलणारे हवशे-नवशे-गवशे आहेत. तेही उद्या राहणार नाहीत. शिवसेनाच खरी, बाकी सर्व धोतऱ्याच्या बिया हे स्पष्टच झाले आहे. शिवसैनिक, शिवप्रेमी जनता आमच्या मागे ठामपणे उभी आहे. उद्धव ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा आता सुरू होईल व राज्याचा माहोल बदलण्याची क्रिया सुरू होईल. त्यानंतरचा उडालेला धुरळा पाहून आजचा आजार जास्तच बळावेल व कितीही जादूटोणा केला तरी शिवसेनेची लाट कोणाला रोखता येणार नाही. पुन्हा 8 ऑगस्टला न्यायालयात सत्य व इमानदारीचाच विजय होईल.