“राहुल शेवाळे कबुतरबाजीत अडकले, पाकिस्तान-दाऊदचाही अँगल!”, सामनातून शिंदेगटाच्या खासदारावर टीकास्त्र
खासदार राहुल शेवाळे यांच्यावर शोषणाचा आरोप करण्यात आला. त्यानंतर राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळून लावले. शिवाय या प्रकरणात पाकिस्तान, दाऊद आणि शिवसेनेच्या ठाकरेगटाचा हात असल्याचं म्हटलं. या आरोपांना सामनातून उत्तर देण्यात आलं आहे.
मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) शिंदेगटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. शिवाय होणाऱ्या आरोपांमागे ठाकरेगटाचा हात असल्याचा आरोप शेवाळे यांनी केला होता. या आरोपांनाही सामनातून खोडून काढण्यात आलं आहे. “दिल्लीच्या भाषेत ज्यास ‘कबुतरबाजी’ म्हटले जाते अशा कबुतरबाजीत खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) अडकले आहेत व त्यास दाऊद , पाकिस्तानचा ‘ अँगल ‘ आला . हे गंभीर आहे”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
“राहुल शेवाळे यांचे असे म्हणणे आहे की , त्यांचे वैयक्तिक , कौटुंबिक व राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे हे कारस्थान आहे व त्यामागे शिवसेनेचे लोक आहेत . शेवाळे यांचा हा दावा खरा नाही .
संबंधित महिलेसोबतचे जे चित्रण प्रसिद्ध झाले त्याचे चित्रीकरण विविध ठिकाणी याच प्रेमी युगुलाने केले आहे . येथे शिवसेनेचा प्रश्न येतोच कोठे ? बाकी राष्ट्रीय तपास यंत्रणेत देशभावना जागरूक असेल तर महाराष्ट्रातील खासदारांच्या कबुतरबाजीचे प्रकरण खणून काढील व ती कोणाचीही गय करणार नाही!”, असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून शेवाळे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्द्यांवर टीका करण्यात आली आहे.
फुटीर गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून व खासकरून ‘एनआयए’कडून तत्काळ चौकशी व्हायला हवी. एका महिलेचे प्रकरण शेवाळे यांच्या अंगावर शेकले आहे व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित हा मामला आहे.
नवाब मलिक यांच्यावर दाऊदसंबंधित लोकांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप ईडी-एनआयएने ठेवला व त्यांना अटक केली. त्यापेक्षा गंभीर प्रकरण संसदेचे सदस्य श्री. शेवाळे यांचे दिसते. दाऊद इब्राहिम, पाकिस्तान, आयएसआयशी संबंधित महिलेशी या खासदारांचे संबंध होते व ते संबंध सरळमार्गी नव्हते, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
संबंधित महिलेसोबत संसद सदस्याचे जे व्हिडीओ आणि फोटो प्रसिद्ध झाले आहेत ते गंभीर तसेच अनैतिक आहेत. लिफ्टमध्ये, हॉटेलमध्ये व इतर अन्य ठिकाणी खासदार व महिलेचे घनिष्ठ नाते स्पष्ट दिसते व ते वर्णन ‘रोमॅण्टिक’ अशाच शब्दात करावे लागेल. संबंधित महिला आपल्याला आता ब्लॅकमेल करते व मी तिची तक्रार केली असल्याचे खासदारांनी सांगणे हा खोटारडेपणा आहे, असं म्हणत सामनातून शेवाळेंवर पलटवार केला आहे.
खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे, पण जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे आचरण स्वच्छ असावे. खासकरून जी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च संसदीय सभागृहाची सदस्य आहे अशा व्यक्तीकडून ही अपेक्षा आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.