‘हांजी हांजी’ म्हणत दसरा मेळाव्याआधी सामनातून मोदींवर टीका, वाचा सविस्तर…
उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. या मेळाव्याआधी सामनाच्या अग्रलेखातून 5G नेटवर्कच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली आहे...
मुंबई : उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भाषण करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या मेळाव्याआधी सामनाच्या अग्रलेखातून 5G नेटवर्कच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका करण्यात आली आहे. “आपल्या देशात ‘5 जी’ आले हे उत्तम, पण ‘5 जी ‘ पेक्षा देशाच्या राजकारणाचे ‘ हांजी हांजी ‘ नेटवर्क गतिमान झाल्याचे दुष्परिणाम आपला देश भोगत आहे . आम्ही ‘5 जी ‘ चे स्वागत करतो . इंटरनेटचा वेग वाढवून ‘ हांजी हांजी ‘ चा वेग कमी केला तर 2029 पर्यंत देश जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था नक्कीच बनेल . ‘5 जी ‘ चे पंख या स्वप्नास बळ देतील”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.
“‘5 जी’मुळे इंटरनेटचा, डिजिटल व्यवहारांचा वेग वाढणार आहे. कॉल ड्रॉप होणे थांबेल. व्हिडीओ, सिनेमे लगेच डाऊनलोड होतील असे अनेक फायदे सांगितले गेले. सध्याच्या बुलेट ट्रेन गतीच्या युगात ते आवश्यक आहेत. त्यातील मुख्य फायदा असा की, ‘5 जी’मुळे देशात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. देशातील खरी समस्या महागाई आणि रोजगाराचीच आहे. डिजिटल भारताचे पुढचे पाऊल बेरोजगारीच्या छाताडावर पडले तर आनंदच आहे”, असं म्हणत 5G सह रोजगाराच्या मुद्दा आजच्या सामनात मांडण्यात आला आहे.
“मोदी यांना वेगाचे वेड आहे. ते देशाला गतिमान करू इच्छितात. त्यांनी जपानच्या मदतीने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्याचे मनावर घेतले व आसपासच्या भागातील जमिनी या प्रकल्पासाठी ताब्यात घेतल्या. म्हणजे या विकासात शेतकरी व जमीनमालकांचेही योगदान आहे हे लक्षात घेतले पाहिजे. देशात सुरू झालेली ‘5 जी’ सेवा विकासात भर घालणारीच आहे, मात्र गेल्या पाच-सहा वर्षांत देशाच्या राजकारणाचे ‘हांजी हांजी’करण ‘5 जी’च्या वेगाने आधीच सुरू झाले व ते पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेस तडा देणारे आहे”, असंही सामनातून म्हणण्यात आलं आहे.