सोनू सूदला पुढे करुन ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न, ‘सामना’तून सोनूच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह
अभिनेता सोनू सूद याने केलेल्या कामावर सामनाच्या रोखठोक सदरातून अनेक प्रश्न उपस्थितीत करत टीका करण्यात आली (Saamana Rokthok criticizes Sonu Sood) आहे.
मुंबई : अभिनेता सोनू सूद गेल्या अनेक दिवसांपासून परप्रांतीय मजुरांना गावी जाण्याची सोय करत (Saamana Rokthok criticizes Sonu Sood) आहे. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनू सूद याने केलेल्या कामावर सामनाच्या रोखठोक सदरातून अनेक प्रश्न उपस्थितीत करत टीका करण्यात आली आहे.
“लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले,” अशी खोचक टीका या सदरातून केली आहे.
रोखठोकमध्ये नेमकं काय म्हटलं?
लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते ? सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यांत पोहोचवले. म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांनी काहीच केले नाही. या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महात्मा सूद यास शाबासकी दिली.
हे कसे झाले ?
एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय ? “कुणाला मुंबईतून उत्तर प्रदेशात जायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरसह एक मेसेज करा. सोनू सूद तुम्हाला घरी पोहोचवेल” असा प्रचार ठरवून झाला. त्या प्रचारासाठी मोठी राजकीय यंत्रणा कामाला लावली गेली. सरकार मजुरांसाठी काम करत नाही. पण सोनू सूद करतोय हे बिंबवण्याचा प्रयत्न झाला.
चेहरा कुणाचा ?
सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. सोनू सूद हा ‘महाबली’, :बाहुबली’ किंवा ‘सुपरहीरो’ आहे असे चित्र रंगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले ( हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) व त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला.
मजुरांच्या पायपीटीवरून देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादे म्हणून वापरले काय ?
यंत्रणा कुणाची ?
सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना ‘घरपोच’ पाठवण्याची व्यवस्था करू शकतो ? या सर्व यंत्रणेचा कर्ताधर्ता शंकर पवार आहे. ते राष्ट्रीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. तर हा फक्त चेहरा आहे. गर्दीतल्या सोनूच्या मागे शंकर पवार उभे असल्याचे अनेक छायाचित्रांत दिसत आहे.
सोनू सूदला महाराष्ट्राच्या राजभवनावर खास बोलवून घेतले व तो करत असलेल्या मदतकार्याची माहिती घेतली. सोनू सूद राजभवनात जाऊन राज्यपालांना भेटला व स्थलांतरीत मजुरांची वेदना मांडली. त्यावर राज्यपालही भावनाविवश झाले. राज्यपालांनी सोनूला आशीर्वाद दिला व म्हणाले, “सोनूजी आप महान कार्य कर रहे है, इसकी जितनी सरहाना की जाए, कम है. राजभवनातून तुला हवी ती मदत मिळेल.” महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती, पोलीस, पालिका कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, बँक कर्मचारी तीन महिन्यांत जीवावर उदार होऊन कोरोनाशी लढत आहेत. मजुरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था मुंबई पालिका व इतर सामाजिक संस्था करीत आहेत. त्या सगळ्यांची यादी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी राजभवन प्रशासनाकडे पाठवायला हवी.
सगळाच गोलमाल
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराज कोरोनामुक्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याशिवाय कुणालाही आपल्या राज्यात घ्यायला तयार नव्हते. मग हे मजूर नक्की पोहोचले कुठे ? लॉकडाऊन काळात इतक्या बसेसची नियमबाह्य व्यवस्था झाली कशी ? सोनू सूद जणू एक समांतर सरकार चालवत होता व त्याला हवे ते मिळत होते. सोनू सूद या महात्माचे नाव आता पंतप्रधान मोदींच्या एखाद्या ‘मन की बात’मध्ये येईल. मग ते दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीस निघतील व एक दिवस ते भाजपचे स्टार प्रचारक म्हणून मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये फिरताना दिसतील.
इतर सर्व हिरो लॉकडाऊन काळात घरीच बसले तेव्हा सोनू सूदचा अभिनय बहरून निघाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले. सोनू सूद पडद्यावर आणि रस्त्यावर उत्तम अभिनय करतो. कारण पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शक तितकेच कसलेले होते. सोनू सूद यांचा पुढील राजकीय चित्रपट कोणता ? त्याचा खुलासा लवकरच होईल ! (Saamana Rokthok criticizes Sonu Sood)
संबंधित बातम्या :
सोनू सूदच्या कामाने रोहित पवार भारावले, घरी जाऊन कौतुकाची थाप