Sadabhau Khot : सदाभाऊ खोतांकडे सांगोल्यातील हॉटेलची 66 हजाराची उधारी? पैसे मिळत नाही तोवर मागत राहणार, हॉटेल मालकाचा इशारा
राष्ट्रवादीला मला रोखता येत नाही त्यामुळे बदनाम करण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा आरोप सदाभाऊंनी केला. आता संबंधित हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी एक रजिस्टर दाखवत सदाभाऊ खोत यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जेवणाचं बिल दाखवलंय.
सोलापूर : रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) सध्या एका व्हिडीओमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. सदाभाऊ सांगोला दौऱ्यावर असताना एका हॉटेल मालकाने त्यांचा ताफा अडवला आणि सगळ्यांसमोर त्याने 2014 मधील उधारीची मागणी सदाभाऊंकडे केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सदाभाऊ चपापले. मात्र, त्यांनी वेळ मारुन नेत तुझं काय असेल तर बघू म्हणून तिथून काढता पाय घेतला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला. त्यानंतर सदाभाऊ यांनी संबंधित हॉटेल मालक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादीला मला रोखता येत नाही त्यामुळे बदनाम करण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा आरोप सदाभाऊंनी केला. आता संबंधित हॉटेल मालक (Hotel Owner) अशोक शिनगारे यांनी एक रजिस्टर दाखवत सदाभाऊ खोत यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जेवणाचं बिल दाखवलंय.
14 दिवसाच्या जेवणाचे एकूण बील 66 हजार 445 रुपये!
हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाभाऊ खोत 2014 साली माढा लोकसभा मतदारसंघातून खासदारकीला उभे राहिले होते. त्यावेळी माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सांगोला तालुक्यात प्रचारासाठी त्यांचे कार्यकर्ते होते. त्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची सुविधा सांगोल्यातील मामा-भाचे या हॉटेलमध्ये करण्यात आली. सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी स्वतः येऊन हॉटेल मालक अशोक शिनगारे यांना कार्यकर्त्यांना जेवण द्यावे अशी विनंती केली. त्यानुसार अशोक शिनगारे यांनी 15 एप्रिल 2014 ते 10 मे 2014 पर्यंत कार्यकर्त्यांना जेवण दिलं. या 14 दिवसाच्या जेवणाचे एकूण बील 66 हजार 445 रुपये झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच बिलाची नोंद असलेलं एक रजिस्टरही शिनगारे यांनी दाखवलं.
सदाभाऊंच्या कार्यकर्त्यांनी कोणकोणत्या पदार्थांवर ताव हाणला?
सदाभाऊंच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या जेवणात प्रामुख्याने मटन, चिकण, मच्छी ताट, अंडाकरी, पनीर भाजी, दालतडका, काजुकरी, शेंगाभाजी, पनीर टिक्का, शेंगाभाजी या पदार्थांचा समावेश होता. सांगोला तालुक्यातील वाटेगाव, राजपूर, सांगोला शहर, मेडसिंगी, आलेगाव, बुरलेवाडी, सावे, बामणी, मांजरी, घेरडी, मेथवडे, देवळे, धायटी या गावातील कार्यकर्ते जेवल्याचा दावा शिनगारे यांनी केलाय. सदाभाऊ खोत हे खोटारडे नेते आहेत. मी त्यांच्यावर विश्वास दाखवला मात्र त्यांनी दगा केला. त्यांचं खोटं लपवण्यासाठी माझ्यावर आरोप करत आहेत. माझ्यावर जे गुन्हे आहेत ते चेक बाऊंस तसेच शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नसून शेतकरी संघटनेचा पदाधिकारी होतो. सदाभाऊसाठी यापूर्वी काम केलं आहे. निवडणूक निकालानंतर त्यांनी माझा फोन घेणं बंद केलं. त्यानंतर वारंवार मी पैशाची मागणी करत राहिलो. मात्र त्यांनी फोन घेतले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत मला बीलाचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत उधारी मागत राहणार, असं शिनगारे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.
सांगोल्यात नेमकं काय घडलं?
16 जून रोजी सदाभाऊ खोत यांचा ताफा सांगोल्यातील एका हॉटेल चालकानं अडवला. 2014 मध्ये सदाभाऊंचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये जेवले पण तेव्हापासून आजपर्यंत जेवणाचे पैसे दिले नाहीत, असा आरोप त्या हॉटेल चालकानं केलाय. आपले पैसे मिळावेत यासाठी हॉटेल चालकानं आज सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला. त्यावेळी त्याने पैशाची मागणी केली. तेव्हा अनेक मोबाईल कॅमेरे त्या ठिकाणी सुरु होते. सदाभाऊ खोत यांनीही सबुरीनं घेत जे काय असेल तर मिटवू असा पवित्रा घेत हॉटेल चालकाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
सदाभाऊ खोतांचं स्पष्टीकरण काय?
टीव्ही 9 शी बोलताना सदाभाऊ खोत यांनी तो हॉटेलचालक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केलाय. मुळात त्या माणसाला मी ओळखत नाही. 2014 च्या निवडणुकीत तुमच्या हॉटेलमध्ये कोण लोक जेवायला आले होते, त्याची यादी द्या. किती लोक होते, हे तो दाखवत नाही. हा माणूस राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. ते काळे झेंडे आणि निदर्शनं करणार होते. पण माझा ताफा लवकर आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यामुळे त्यांचं इतर नियोजन बारगळलं. 2014 पासून आतापर्यंत मी सांगोला तालुक्यात, परिसरात 50 वेळा आलो आहे. ज्या माणसाला मी ओळखत नाही, माझा मुलगा ओळखत नाही, ज्या माणसाकडे पुरावा काही नाही. राष्ट्रवादीला असं वाटतं की लढणाऱ्या माणसाला पहिल्यांदा बदनाम करायचा, समाजाच्या मनातून उतरायचा. पण आम्ही यांच्या बापाचं जेवण जेऊन आलेलो आहोत. आम्ही भविष्यात निश्चितपणे यांच्याशी दोन हात करु. या व्यक्तीविरोधात सांगोला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केलाय. हा काय प्रकार आहे, 10 – 10 वर्षे तो का गप्प होता? हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे आणि याच्यामागे राष्ट्रवादीच्या नेत्याचा हात आहे, असा आरोप खोत यांनी केलाय.
सांगोल्यात एका हॉटेल चालकानं सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला. 2014 मधील जेवणाचे पेसे दिले नसल्याचा आरोप त्याने केला. त्यावर खोतांनी तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केलाय. #SadabhauKhot #Sangola #HotelMeal #ViralVideo
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा : https://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/cEKehiqjx2
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2022
सदाभाऊंची सुरक्षा वाढवा, गृहमंत्र्यांच्या सूचना
दरम्यान, सांगोल्यात सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांच्या जीविताला धोका असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिलीय. त्यांच्या जीविताला धोका आहे असं मला काही वाटत नाही. पण त्यांची काळजी पाहता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांना दिल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिलीय.