Sadabhau Khot : चंद्रकांत पाटलांना अनेकांचा हिमालयात जाण्याचा सल्ला; आता सदाभाऊंनी पवारांनाही करुन दिली एका वक्तव्याची आठवण!
चंद्रकांतदादांबाबत सोशल मीडियावर अनेक विनोद फिरवण्यात येऊ लागलेत. अशावेळी चंद्रकांत पाटील यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर माजी मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनीही शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या वक्तव्यांची आठवण करुन देत, खोचक प्रश्न विचारले आहेत.
पुणे : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आणि महाविकास आघाडीचे नेते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर तुटून पडले. निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीपूर्वी केलं होतं. मात्र, कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांचा 19 हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव करत काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी झाल्या. त्यानंतर महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवत त्यांना हिमालयात जाण्याचा सल्ला दिला. तसंच चंद्रकांतदादांबाबत सोशल मीडियावर अनेक विनोद फिरवण्यात येऊ लागलेत. अशावेळी चंद्रकांत पाटील यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर माजी मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनीही शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या वक्तव्यांची आठवण करुन देत, खोचक प्रश्न विचारले आहेत.
सदाभाऊंचा शरद पवारांवर निशाणा
कोल्हापूरच्या विधानसभा पोटनिवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीतील काही लोक चंद्रकांत पाटलांना हिमालयात जाण्याचा सल्ला देत आहेत. या लोकांना मला सांगायचं आहे की, शरद पवार जेव्हा एस काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा म्हणाले होते की मी पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही आणि गेलो तर तोंडाला काळं फासून हिमालयात जाईन. लगेच ते काँग्रेसवासी झाले. काँग्रेसमधून लगेच बाहेर पडले आणि राष्ट्रवादीची स्थापना केली. लगेच काँग्रेससोबत युती करुन सत्तेत बसले. परंतु आजतागायत ते हिमालयात गेले नाहीत.
सदाभाऊंचा ट्विटरवरुनही निशाणा
चंद्रकांत दादा ना हिमालयात जायचा सल्ला काँग्रेसी, राष्ट्रवादी, शिवसेनेवाले देत आहेत. . पवारांची नाव लावणार नाही म्हटलेली औलाद बदलली आणि जबान बदलली. . चंद्रकांतदादा पाटील ह्यांना तुम्ही कोरा सल्ला देऊ नका.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) April 17, 2022
अजित पवारांनाही खोचक सवाल
या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीपूर्वी म्हणाले होते की, जर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर पवाराची औलाद सांगणार नाही. आजही शेतकरी कर्जबाजारी आहे, आत्महत्या करतोय पण त्यांचा सातबारा कोरा केला नाही. मग ते आता कोणत्या पद्धतीनं आपल्या शब्दाचं समर्थन करणार?
शिवसेनेला जाहीरनाम्यावरुन टोला
शिवसेनेनं सत्तेत येण्यापूर्वी जाहीरनाम्यात सांगितलं होतं की, दरवर्षी शेतकऱ्याच्या खात्यात 10 हजार रुपये भरू. तसंच राज्यातील जनतेची एक रुपयात आरोग्य तपासणी आणि मोफत आरोग्य सुविधा दिल्या जातील. त्या आरोग्य सुविधा कुठे गेल्या?
पटोलेंना संन्यास घेण्याची आठवण
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की गडकरींविरोधात आम्ही निवडणूक हरलो तर राजकीय संन्यास घेईन. हे संन्यासी आता कुठे गेले? याचं उत्तर या महाविकास आघाडीनं द्यावं आणि मगच चंद्रकांत पाटील यांना सल्ले द्यावेत.
चंद्रकांत पाटलांचंही प्रत्युत्तर
भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा आजच्या निवडणुकीत पराभव झाला. आता निवडणूक प्रचारात दावा केल्याप्रमाणे तुम्ही हिमालयात जाणार का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांना करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, माझा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तर राजकारण सोडेन हिमालयात जाईन, असा दावा केला होता. आमचा नाना (सत्यजित कदम) लढले तर तुमच्या तोंडाला एवढा फेस आला मी लढलो तर काय हाल होतील, याचा विचार करा, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय.
इतर बातम्या :