भोपाळमध्ये भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी
भोपाळ (मध्यप्रदेश) : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपकडून मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भोपाळ मतदारसंघातून साध्वी प्रज्ञा सिंह लढणार आहे. काल म्हणजेच मंगळवारी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज त्यांना भोपाळमधून उमेदवारी घोषित करण्यात आली. सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम […]
भोपाळ (मध्यप्रदेश) : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपकडून मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भोपाळ मतदारसंघातून साध्वी प्रज्ञा सिंह लढणार आहे. काल म्हणजेच मंगळवारी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज त्यांना भोपाळमधून उमेदवारी घोषित करण्यात आली.
सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील हायप्रोफाईल मतदारसंघ अशी ओळख असलेल्या भोपाळमधून काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भोपाळ मतदारसंघातून भाजपकडून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, नरेंद्रसिंह तोमर आणि उमा भारती यांची नावे सातत्याने चर्चेत होती. मात्र भाजपतर्फे या नावांवर शिक्कामोर्तब न करता साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी दिली आहे.
Madhya Pradesh: Sadhvi Pragya Singh Thakur has arrived at the BJP office in Bhopal and is currently meeting senior BJP leaders Shivraj Singh Chouhan, Ramlal, and Prabhat Jha. pic.twitter.com/9rG7KuLiq0
— ANI (@ANI) April 17, 2019
काही दिवसांपूर्वी साध्वी प्रज्ञा यांनी ‘मी निवडणूक लढणार आणि जिंकणारही. मला शिवराज सिंह यांचा पाठिंबा आहे,’ असे सांगितले होते. दरम्यान आज भाजप कार्यालयात साध्वी प्रज्ञा भाजप नेते रामलाल, अनिल जैन, शिवराज सिंह चौहान यांच्याशी अनौपचारिक भेट घेण्यात आली होती.
मध्यप्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपने 1989 पासून सलग या ठिकाणी बाजी मारली आहे. त्यामुळे भोपाळच्या हायप्रोफाईल मतदारसंघात काँग्रेस नेते दिग्विजय सिंह विरुद्ध भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. येत्या 12 मे रोजी भोपाळमध्ये मतदान होणार आहे.
साध्वी प्रज्ञा कोण आहेत?
साध्वी प्रज्ञा यांचा जन्म मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील कछवाहा गावात झाला आहे. त्यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. साध्वी प्रज्ञा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखेतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सक्रिय सदस्या आहेत. त्याशिवाय मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील त्या आरोपी आहेत. या बॉम्बस्फोटात सात लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर साध्वींसह अन्य आरोपींना एनआयए कोर्टाने मोक्का कायद्यातंर्गत मुक्त केले होते. पण त्याचवेळी बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायदा (युएपीए) कायद्यातंर्गत हे आरोप कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान सध्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी खटला सुरु आहे.