Rajya Sabha Election 2022: अखेर आश्वासनानंतर सपाची नाराजी दूर, एमआयएमचा अद्याप निर्णय नाही
Rajya Sabha Election 2022: समाजवादी पार्टीचे नेते अबु असीम आजमी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली भूमिका मांडत नाराजी व्यक्त केली.
मुंबई: महाविकास आघाडीने (maha vikas aghadi) हे सरकार सेक्युलर आहे की हिंदुत्ववादी, हे आधी स्पष्ट करावं. तरच राज्यसभेला मतदान (rajya sabha election) करण्याची भूमिका स्पष्ट करू, असा हेका लावणाऱ्या समाजवादी पार्टीचा (samajwadi party) अखेर रुसवा गेला आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं समाजवादी पार्टीने स्पष्ट केलं आहे. आघाडीकडून सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देण्यात आल्यानंतर अखेर समाजावादी पार्टी बॅकफूटवर आली आहे. भाजपपेक्षा काँग्रेस कधीही चांगली. त्यामुळे आम्ही आघाडीला पाठिंबा देत आहोत, असं सपाचे नेते अबू असीम आजमी यांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे एमआयएमने अजूनही आपले पत्ते खोलले नाहीत. त्यामुळे एमआयएमची मते आघाडीला मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, मनसेने आपल्याला मत देणार असल्याचं स्पष्ट केल्याचा दावा, भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनेही आपले पत्ते अजून खोलले नाहीत. 10 जून रोजीच बविआ आपली भूमिका जाहीर करणार आहे.
समाजवादी पार्टीचे नेते अबु असीम आजमी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली भूमिका मांडत नाराजी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर आजमी यांनी आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आघाडीचं मोठं टेन्शन दूर झालं आहे. समाजवादी पार्टीकडे दोन आमदार आहेत. हे दोन्ही आमदार सरकार स्थापनेपासून आघाडीसोबत आहेत.
अजित पवार, नार्वेकरांची मध्यस्थी?
समाजवादी पार्टीने नाराजी व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आजमींशी चर्चा केली. यावेळी परिवहन मंत्री अनिल परबही उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांनी आजमींचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर आजमी यांची समजूत काढली. त्यामुळे आघाडीला मतदान करायला आजमी तयार झाल्याचं सांगितलं जातं.
बैठकीला दांडी
सपाचे आमदार रईस शेख यांनी काल परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली होती. यावेळी अनिल परब यांच्याकडे शेख यांनी मागण्यांचं निवदेन दिलं होतं. यावेळी आजमी जो निर्णय घेतील तोच आम्हाला मान्य असेल असं शेख यांनी म्हटलं होतं. त्यानंतर संध्याकाळी ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीला सपाने दांडी मारली होती. त्यामुळे सपा आघाडीला मतदान करणार नसल्याचं सांगितलं जात होतं.
थेट अखिलेश यादवांची सेटिंग
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आघाडीकडून समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्याशी संपर्क साधण्यात आला. अखिलेश यादव यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच आजमी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दुपारी मीडियाशी संवाद साधला होता. त्यातून त्यांनी अखिलेश यादवांशी संपर्क साधल्याचे संकेत दिले होते. समाजवादी पार्टीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा झाली आहे. महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमावर चाललं आहे. त्यामुळे त्यांचाही पाठिंबा मिळेल, असं राऊत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे ही शक्यता व्यक्त केली जात आहे.