सांगली : आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असलेले आणि राजकीय घडामोडींवर सडेतोड मतप्रदर्शन करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) चक्कर आल्यानं सायकलवरुन पडल्याची माहिती मिळतेय. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कमरेखाली खुब्याला मार लागला आहे. भारती रुग्णालयात (Bharti Hospital) त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. संभाजी भिडे नित्यनियमाने सांगलीतील (Sangli) गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असतात. आजही ते दर्शनासाठी सायकलवरुन जात होते. त्यावेळी गणपती पेठ परिसरात त्यांना चक्कर आल्यानं ते जमिनीवर कोसळले. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळतेय.
दरम्यान, संभाजी भिडे यांनी कालच एक वक्तव्य केलं होतं. व्यक्तीच्या जीवनात भूतबाधा होते. समाजात खाण्या पिण्यातून अनेकांना विषबाधा होते. या भूतबाधेवर, विषबाधेवर उपाय आहे. पण हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच बाधा, दुसरी आंग्ल बाधा आणि तिसरी गांधी बाधा, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. मिरजमध्ये शिवतीर्थ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या अनावरण कार्यक्रमात संभाजी भिडे बोलत होते. ते म्हणाले की, म्लेंच बाधा, आंग्ल बाधा आणि तिसरी गांधी बाधा. या तिनही बाधांवर तोडगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची उपासना आपण केली पाहिजे.
म्लेंच बाधा म्हणजे पाकिस्तान, बांग्लादेशच्या मुस्लिम समाजाच्या विचारांची बाधा, आंग्ल बाधा म्हणजे इंग्रज आपल्यावर स्वार झाले आणि त्यामुळे झालेली इंग्रजी विचारांची बाधा, तर शस्त्राविना स्वातंत्र्य मिळते हा विचार म्हणे गांधी विचारांची बाधा. अशा तीन बाधा हिंदुस्थानला झाल्याचं संभाजी भिडे म्हणाले.
त्याचबरोबर हिंदुस्थान चोरांच्या ताब्यात आहे. त्यांना नेस्तनाबूत करा. देशावर भगव्याचे राज्य स्थापित करा. छत्रपतींची ती अपेक्षा आहे. ते पूर्ण करण्याचं काम आपल्याला करावं लागेल. देशाला ताकद देण्यासाठी हिंदुस्थानच्या सर्व समाजातील 123 कोटी जनतेचा रक्तगट बदलला पाहिजे. त्यांचा रक्तगट शिवाजी-संभाजी केला पाहिजे, असंही वक्तव्य त्यांनी मंगळवारी केलं.
इतर बातम्या :