सांगलीतील राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हत्येचं गूढ अखेर उकललं!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर पाटील यांची काल हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येचं गुढ आता उकललं आहे. भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी शिवसेनेच्या दिनकर पाटील याने मनोहर पाटलांची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर पाटील यांची काल हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येचं गुढ आता उकललं आहे. भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी शिवसेनेच्या दिनकर पाटील याने मनोहर पाटलांची हत्या केल्याचं समोर आलं आहे (NCP Leader Manohar Patil Murder). मनोहर पाटील आणि दिनकर पाटील यांच्यातल्या राजकीय वर्चस्ववादामुळे सांगलीत हा हत्येचा थरार रंगला.
कवठेमहांकाळ तालुक्यातील परंपरागत राजकीय वर्चस्ववाद आहे. त्यातून 2016 साली शिवसेनेच्या जिल्हा उपप्रमुख दिनकर पाटील (Shivsena Dinkar Patil) यांच्या भावाची हत्या झाली होती. या हत्येच्या प्रकरणात मनोहर पाटील यांनी हल्लेखोरांना आर्थिक मदत केल्याचा संशय दिनकर पाटलांना होता (NCP Leader Manohar Patil Murder). त्या रागातून गुरुवारी (6 जानेवारी) दिनकर पाटील यांनी पुतण्या आणि एका साथीदाराच्या मदतीने राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांची हत्या केली. हत्येच्या या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शिवसेनेचे पदाधिकारी दिनकर पाटील यांच्यासह अन्य दोघांना अटक केली आहे. मनोहर पाटील हे राष्ट्रवादीचे नेते आणि कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती होते.
कवठेमंकाळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिनकर पाटील यांची राजकीय कारकीर्द नेहमीच हत्येच्या घटनेत गुंफली गेली होती. काहीवर्षांपूर्वी पवनचक्कीच्या वादातून दिनकर पाटील यांनी रामचंद्र जाधव यांची हत्या केल्याचा आरोप होता. या प्रकरणातून दिनकर पाटील यांची निर्दोष सुटका झाली होती. रामचंद्र जाधव हे मनोहर पाटील यांचे समर्थक होते. या घटनेतून दिनकर पाटील यांची सुटका होताच न्यायालयाच्या आवारात पाटील समर्थकांनी जल्लोष केला होता. तेव्हापासून दिनकर पाटील आणि मनोहर पाटील यांच्या गटात धुसफूस सुरु होती.
2016 साली निवडणुकीच्या वादातून दिनकर पाटील यांचे बंधू युवराज पाटील यांची कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली-टी येथे निर्घुण हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या कटात मनोहर पाटील यांचा सहभाग असून हल्लेखोरांना आर्थिक रसद पुरवण्याचा संशय दिनकर पाटील यांच्या मनात होता. 2016 पासूनच हा राजकीय वाद गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे वळला. आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दिनकर पाटील यांनी आपल्या पुतण्याच्या मदतीने मनोहर पाटील यांचा काटा काढला.
हरोली-टी येथे मनोहर पाटील हे ऊसतोडणी मजुरांशी चर्चा करत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मनोहर पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिथे मनोहर पाटील यांना मृत घोषित करण्यात आले.
यानंतर राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील हत्या प्रकरणी तीन आरोपींना कवठेमहंकाळ पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. दिनकर बाळासो पाटील यांनी आपल्या पुतण्याच्या मदतीने मनोहर पाटील यांची हत्या केल्याचं उघड झाले आहे. यामध्ये दिनकर बाळासो पाटील, अभिजीत युवराज पाटील, विनोद बाजीराव पाटील यांना अटक करण्यात आली आहे. यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांचा खून झाल्याची घटना गंभीर आहे. सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख या दोन्ही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सखोल तपास करतील अशी अपेक्षा आहे. जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल”, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणावर दिली.