Sanjay Pawar : ‘उद्धव साहेबांना देव मानतो, मातोश्रीला मंदिर मानतो’, उमेदवारी जाहीर होताच कोल्हापुरच्या संजय पवारांची पहिली प्रतिक्रिया
माध्यमांशी बोलताना पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. तसंच खूप आनंदी असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिलीय. 'मी शिवसेना प्रमुखांना, उद्धव ठाकरेंना देव मानतो, मातोश्रीला मंदिर मानतो', असंही संजय पवार यावेळी म्हणाले.
कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता राज्यसभेसाठी शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांचं नाव शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आहे. आपल्या नावाची घोषणा झाल्यानंतर संजय पवार चांगलेच आनंदी झाले आहेत. माध्यमांशी बोलताना पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे आभार मानले. तसंच खूप आनंदी असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिलीय. ‘मी शिवसेना प्रमुखांना, उद्धव ठाकरेंना देव मानतो, मातोश्रीला मंदिर मानतो’, असंही संजय पवार यावेळी म्हणाले.
‘उद्धव ठाकरेंचा विश्वास सार्थ करण्यासाठी प्रयत्न करेन’
राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय पवार यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिलीय. ‘मला आता आपल्या माध्यमातून समजलं. खासदार संजय राऊत यांनी माझ्या नावाची घोषणा केली आहे. याचा मला खूप आनंद झाला आहे. आता उमेदवारी जाहीर झाली आहे तर त्या पद्धतीने सगळी तयारी करावी लागणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करण्यासाठी मी चांगलं काम करु दाखवेन. सगळे कागदपत्र तयार होतील, काही अडचण येणार नाही, असं संजय पवार म्हणाले.
‘उद्धवसाहेबांना देव मानतो, मातोश्रीला मंदिर मानतो’
तसंच एका शिवसैनिकाला, जो शिवसैनिक कोल्हापूरसारख्या शहरात 30 वर्षापासून अखंडपणे काम करतोय. सर्व चढउतारामध्ये शिवसेना प्रमुखांना देव मानतो, उद्धवसाहेबांना देव मानतो, मातोश्रीला मंदिर मानतो. जो शिवसैनिक 15 वर्षे नगरसेवक होता, 14 वर्षे जिल्हाप्रमुख आहे, शहरप्रमुख होता, करवीर तालुका प्रमुख होता, सर्वसामान्य शाखाप्रमुखापासून इथपर्यंत पोहोचला आहे. असं कुठल्या पक्षात घडतं? हे फक्त शिवसेनेतच घडतं. मी सर्व जनतेचे, कोल्हापूरकरांचे आभार मानतो, असंही पवार यांनी म्हटलंय.
‘बॉस इज ऑलवेज राईट’
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असं म्हटलं होतं. त्यानंतर दुपारी अचानक संजय पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे पवार यांचं नाव डमी उमेदवार म्हणून तर नाही ना? अशीही एक चर्चा आहे. त्याबाबत विचारलं असता, डमी असू दे की खरा असू दे, उद्धव ठाकरे हे आमचे बॉस आहेत आणि बॉस इज ऑलवेज राईट. ते जो काही निर्णय घेतील तो हा शिवसैनक मान्य करेल, असं संजय पवार म्हणाले.