संजय राठोड सुरतला जाऊन मध्यस्थी करणार; एकनाथ शिंदेंचा फायनल निर्णय काय?
माजी मंत्री संजय राठोड हे आता सुरतला जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. संजय राठोड हे मध्यस्थी करणार आहेत. जर मध्यस्थी होऊ शकली नाही तर एकनाथ शिंदे आपला निर्णय आज रात्री कळवणार आहेत.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले आहे. सध्या एकनाथ शिंदे हे सुरतमध्ये (surat) असून, त्यांच्यासोबत शिवसेनेचे 35 आमदार असल्याचा दावा भाजपाकडून (bjp) करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यास राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळू शकते. या पार्श्वभूमीवर सध्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. माजी मंत्री संजय राठोड हे आता सुरतला जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. संजय राठोड हे मध्यस्थी करणार आहेत. जर मध्यस्थी होऊ शकली नाही तर एकनाथ शिंदे आपला निर्णय आज रात्री कळवणार आहेत. मध्यस्थि यशस्वी न ठरल्यास शिंदे हे एकतर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. किंवा नव्या पक्षाची देखील घोषणा करू शकतात.
दिल्लीतील हालचाली वाढल्या
दरम्यान दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर दिल्लीच्या राजकारणातील हालचालींना वेग आला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. देवेंद्र फडणवीस देखील आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले होते. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार आहेत, त्यांना अमित शाह यांच्या भेटीला पावठले जाणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. शिंदे नक्की काय निर्णय घेणार हे आता संजय राठोड यांच्या भेटीनंतरच स्पष्ट होणार आहे. मध्यस्थी न झाल्यास शिंदे आपला निर्णय आज रात्री जाहीर करणार आहेत.
आमदार पुन्हा परतणार
दरम्यान या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, राज्यात राजकीय भूकंप येणार नाही. आमचा एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला आहे. काही आमदार आमच्या संपर्कात नाही हे नक्की खरे आहे. मात्र या आमदारांसोबत जेव्हा आमचा संपर्क होईल तेव्हा ते नक्की परत मुंबईमध्ये येतील असं राऊत यांनी म्हटले आहे. तसेच जी नाराजी असेल ती दूर करू असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक आहेत. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग आहे. भाजपाचा सत्ता पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे.