देवेंद्र फडणवीस आता बदललेत, पूर्वीचे आणि आताचे वेगळे, संजय राऊतांनी काय सांगितलं?
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला असताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना फोन केला होता. तुम्हाला मुख्यमंत्री करतो, अशी ऑफर दिली होती, असा नवा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यात खूप बदल झालाय. पूर्वीचे देवेंद्र फडणवीस आता राहिले नाहीत. त्यांना सनसनाटी वक्तव्य करण्याचा छंद का जडलाय माहिती नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय बुद्धी कौशल्याची अनेकदा स्तुती केली जाते. संजय राऊत यांनीही अनेकवळे फडणवीसांचं चातुर्य मान्य केलेलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये विशेषतः शिंदे-भाजप युती झाल्यापासून देवेंद्र फडणवीस बदलले असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी याआधीही केलं. आजदेखील माध्यमांशी बोलताना त्यांनी आवर्जून या मुद्द्याचा उल्लेख केला. २०१९ मधील अजित पवारांसोबतच्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच काही गौप्यस्फोट केले. तसेच मविआ काळात मला अटक होणार होती, असाही दावा केला. या वक्तव्यांवरून संजय राऊत यांनी फडणवीसांमध्ये बदल झाल्याचं म्हटलं आहे.
फडणवीसांचा नवा गौप्यस्फोट काय?
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला असताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना फोन केला होता. तुम्हाला मुख्यमंत्री करतो, अशी ऑफर दिली होती, असा नवा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
राऊत काय म्हणाले?
फडणवीसांच्या या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, ‘ फडणवीस यांना सनसनाटी करण्याची सवय लागलीय. पूर्वीचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यात फरक आहे. त्यांना स्टंट आणि सनसनाटी निर्माण करण्याचा छंद का जडला मला माहीत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून जात होते. अशावेळी जे सरकार बनवू इच्छितात त्यांच्याशी उद्धव ठाकरे बोलले असतील. बोलू शकतात. इतक्या दिवसानंतर सनसनाटी निर्माण करून काय साध्य करू इच्छितात ते पाहावं लागेल, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.
दिल्ली की मर्जी…
तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदावरच किती काळ राहतील, हे सांगता येत नाही, असा सूचक इशाराही राऊत यांनी दिला आहे. ते म्हणाले, ‘ उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती ना. आज तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. किती काळ उपमुख्यमंत्री राहाल हे सांगता येत नाही. दिल्ली की मर्जी है ये. ठिक आहे. सनसनाटी एन्जॉय करा.
पोटनिवडणुकीत पैसा वाटप?
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपतर्फे पैसे वाटप होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतर्फे करण्यात येतोय. संजय राऊत म्हणाले, मागच्या काळात बारामती आणि पुणे भागात पोलिसांच्या मदतीने पैशांचं वाटप करण्यात आले होते. पोलिटिकल एजंट म्हणून पैसे वाटतात हे पुराव्याने सिद्ध झालं आहे. कसब्याचे उमदेवार रवींद्र धंगेकरांनी आरोप केला असेल तर त्यांच्याकडे पक्की माहिती आहे. भाजपच्या कालखंडात पोलिसांच्या वाहनातून आवक जावक झालीय. त्यामुळे विश्वास ठेवावा लागेल.